१ लाखहून अधिक नागरिकांची मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईनला पसंती; गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ
By धीरज परब | Published: December 31, 2022 06:36 PM2022-12-31T18:36:06+5:302022-12-31T18:38:01+5:30
पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी आवाहन केले होते. याच बरोबर पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधाही उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत १२३ कोटी ५ लाख ७४ हजार एवढी कर वसुली झाली आहे.
शहरातील नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेच्या कर भरणा केंद्रात जाऊन रांगा लावाव्या लागत होत्या. यामुळे नागरिकांचा प्रचंड वेळ जायचा. याशिवाय येण्या-जाण्यासाठीही खर्च व्हायचा. पालिकेने ऑनलाईन कर भरण्याची सुविधा दिली होती मात्र त्याला फारसा प्रतिसाद काही कारणांनी मिळत नव्हता. आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संजय शिंदे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी राजकुमार घरत यांनी नागरिकांना ऑनलाईन कर भरणाकरणे सहज सुलभ व्हावे म्हणून ॲप व संकेतस्थळात काही बदल करून ते अद्यावत केले. तसेच ऑनलाईन सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून नागरिकांनी कर भरावा, असे आवाहनही केले जात होते.
सदर आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत २९ डिसेंबर २०२२ च्या मध्यरात्रीपर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी ऑनलाईन कर भरणा केला आहे. २९ डिसेंबर २०२१च्या मध्यरात्रीपर्यंत ऑनलाईन कर भरणा करणाऱ्या नागरिकांची संख्या ७२ हजार १९३ इतकी होती. गत वर्षीच्या तुलनेत ऑनलाईनकर भरणा करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत ४० टक्के वाढ झाली आहे.
ऑफलाईन पद्धती मध्ये रोखीने ७१ हजार ६५ मालमत्ता धारकांनी तर धनादेश व डिमांड ड्राफ्ट द्वारे ७४ हजार १४० मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे. ऑनलाईन पद्धतीने ४८ कोटी ३१ लाख ४२ हजार तर ऑफलाईन पद्धतीने ७४ कोटी ७४ लाख ३३ हजार इतका कर भरणा झाला आहे. ऑनलाईन कर भरण्याचे प्रमाण आणखी वाढवण्याची आवश्यकता असून त्यासाठी पालिका आणखी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त ढोले म्हणाले.