ठाण्यात अतिउत्साही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना बॅनरवर दिली ‘हिंदुहृदयसम्राट’ची उपाधी
By जितेंद्र कालेकर | Published: June 12, 2024 03:35 PM2024-06-12T15:35:15+5:302024-06-12T15:36:04+5:30
वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर, दोन वर्षांपुर्वीची पुनरावृत्ती
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनर लावले आहेत. या बॅनरवर राज यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा केला आहे. यापूर्वीही दोन वर्षांपूर्वी ठाण्यात राज यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा केला होता. पण त्यावर दस्तुरखुद्द राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हे बॅनर काढले होते. पुन्हा यावर्षी अशाच आशयाचे बॅनर लागल्याने ठाण्यात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी त्यांची वेशभूषा तसेच पक्षाची भूमिकाही बदलली आहे. या आधी मराठीच्या मुद्दयावर आक्रमक भूमीका घेणाऱ्या राज यांनी आता हिंदुत्वाच्या भूमीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार २०२२ मध्ये राज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावलेल्या शुभेच्छा बॅनरवरही राज याचा ‘हिंदुह्रदयसम्राट’ असा उल्लेख करण्यात आला होता. याच बॅनरवरुन त्यावेळी चांगलेच राजकारण रंगले होते. त्यामुळेच स्वत: राज यांनी यावर अशा उपाधीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हे बॅनर हटविण्यात आले होते. त्यावेळीही स्वत: राज ठाकरे यांनी या देशात फक्त एकच हिंदूहृदयसम्राट ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे हेच होते, असे म्हटले होते. दरम्यान, पुन्हा ठाणे शहरात मनसेच्या पदाधिकाºयांनी बॅनरबाजी केली आहे. त्यात ठाण्याच्या तलावपाळी परिसरात आशिष डोके यांच्याकडून लावलेल्या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदुह्रदयसम्राट असा केला आहे. हा बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.