ठाकुर्लीच्या कोंडीवर मात

By admin | Published: April 17, 2017 05:55 AM2017-04-17T05:55:54+5:302017-04-17T05:55:54+5:30

ठाकुर्लीतील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रेल्वेचे फाटक दीर्घकाळ खुले रहात असल्याने आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला सतत अडथळा येत

Over Thakurli's dilemma | ठाकुर्लीच्या कोंडीवर मात

ठाकुर्लीच्या कोंडीवर मात

Next

कल्याण : ठाकुर्लीतील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रेल्वेचे फाटक दीर्घकाळ खुले रहात असल्याने आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीला सतत अडथळा येत असल्याने या भागातून अवजड वाहने नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याची अधिसूचना लवकरच निघणार असून तोवर प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या बंदीमुळे राजेंद्रप्रसाद रस्ता, टंडन रोडवरील वाहतूक वाढणार असून तेथील कोंडी फोडण्यासाठी तेथे जादा वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
चोळेगाव, ठाकुर्ली रेल्वे फाटकातून जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने सतत वाहतूक कोंडी होते आहे. त्यातही फाटक दीर्घकाळ खुले रहात असल्याने रेल्वे वाहतूक दररोज खोळंबून रहात होती. त्यामुळे वाहतूक विभागाने अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वाहतूक विभागाने फलकही लावले आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील रेल्वेच्या समांतर रस्त्यामुळे हे फाटक आणि चोळेगावचा रस्ता पश्चिमेत जाण्यासाठी वाहनचालक सर्रास वापरतात. सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ या काळात हनुमान मंदिर परिसरातील चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. अपुरे मनुष्यबळ, शहरात ठिकठिकाणी होणारी कोंडी फोडण्यासाठी तैनात ठेवावी लागणारी यंत्रणा यामुळे चोळेगावातील कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते. शिवाय रेल्वे वाहतुकीला बसणारा फटका यावर उपाययोजना म्हणून अवजड वाहनांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग वापरा
चोळेगाव-ठाकुर्ली भागात जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याने संबंधित वाहनांनी घरडा सर्कल- शेलार चौक- मंजुनाथ शाळा याठिकाणी उजव्या बाजुला वळण घेऊन इच्छितस्थळी जावे किंवा टंडन रस्त्यावरून कोपर ओव्हरब्रीजमार्गे डोंबिवलीच्या पश्चिम भागात जावे, असे आवाहन वाहतूक उपविभागाने केले आहे.

लवकरच अधिसूचना
वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कोअर कमिटीने दिलेल्या अहवालावर लवकरच अधिसूचना जारी होईल. मात्र प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी सांगितले.
टंडन रस्त्यावरही पोलीस
ठाकुर्लीतून अवजड वाहनांना नो एण्ट्री केल्याने ही सर्व वाहने टंडन रस्त्यामार्गे डोंबिवलीच्या पश्चिम बागात जातील. त्यामुळे वर्दळ वाढेल. आधीच तेथे वाहनांची संख्या अधिक आहे. रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे अहोरात्र होणारी कोंडी फोडण्यासाठी तेथील तिन्ही चौकांत वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय शिवमंदिर चौक आणि वामन जोशी चौकातही पोलीस असल्याने वाहतूक वळवण्याचा प्रयोग फारशी कोंडी न होता रविवारी यशस्वीरित्या पार पडला.

Web Title: Over Thakurli's dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.