कोरोनावर मात करीत त्या दामपत्याची घर वापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 02:51 PM2020-04-29T14:51:12+5:302020-04-29T14:52:42+5:30
कोरोनावर मात करीत अखेर १४ दिवसानंतर परांजपे दामपत्याची घर वापसी झाली आहे. सोसायटीमधील नागरीकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. आता पुढील १२ मे पर्यंत ते होम क्वॉरन्टाइन असणार आहेत.
ठाणे : समाजसेवा करता करता, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीने कोरोनावर यशस्वी मात करीत घर वापसी केली आहे. या १४ दिवसांच्या कालावधीत मुलांची खुप आठवण येत होती असे त्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री त्यांच्या दोन टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांची घर वापसी झाली. यावेळी सोसायटीमधील सर्वच नागरीकांनी त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत केले.
ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांना आता या संसर्गावर मात करीत घरवापसी घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. राष्ट्रवादीचे जवळ जवळ १२ पदाधिकारी आता कोरोनावर मात करुन घरी सुखरुप परतले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीने देखील आता कोरोनावर मात करीत घरवापसी केली आहे. मागील १४ एप्रिलला ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांना दोन लहान मुले आहेत, त्यांची दोन वेळा टेस्ट करण्यात आली. दोनही वेळेला टेस्ट निगेटीव्ह आली. तसेच त्यांच्या घरातील अन्य एक ा सदस्याची देखील टेस्ट करण्यात आली, ती देखील निगेटीव्ह आली. त्यामुळे त्यांच्या मुलांचा योग्य रितीने सांभाळ या व्यक्तीनेच केल्याचे परांजपे यांनी सांगितले. मागील १४ दिवसात अनेक विचार डोक्यात घोंगावत होते. त्यात मुलांची काळजी जास्त सतावत होती. परंतु त्यांचा सांभाळ योग्य झाला आणि आम्ही देखील आता यातून पूर्णपणे बरे झालो असल्याचेही माहिती परांजपे यांनी दिली. मंगळवारी रात्री उशिरा आम्हाला डिसार्च देण्यात आला. त्यानंतर सोसायटीमध्येही आमचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ्यांच्या गजरात स्वागत पाहून आम्हालाही खुप बरे वाटले. असा आजार कोणालाही होऊ नये हीच प्रार्थना या निमित्ताने करीत आहे.
- एकूणच प्रशासनाने जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे सर्वांनी पालन करावे, पोलीसांना सहकार्य करावे, घरात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवावे, मी कोरोनावर मात करुन घरी परतलो आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाला घरात आणून नये अशी विनंती या निमित्ताने समस्त ठाणेकरांना करीत असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.