हंडाभर पाण्यासाठी रात्रभर विहिरीवर..! गावपाड्यांमध्ये पाणीटंचाईचे विदारक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:50 AM2019-02-05T03:50:52+5:302019-02-05T03:51:09+5:30
ठाण्यासह मुंबईचीही तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना पाणीटंचाईचे असह्य चटके सोसावे लागत आहेत.
- जनार्दन भेरे
भातसानगर : ठाण्यासह मुंबईचीही तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना पाणीटंचाईचे असह्य चटके सोसावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी मध्यरात्रीपासूनच विहिरीवर थांबावे लागत असल्याने या भागातील ग्रामस्थ पुरते हैराण झाले आहेत.
शहापूर तालुक्यातील गोलभन, अजनुप, गायदरा, कोळीपाडा इत्यादी गावांमधील पाणीटंचाईचा आढावा घेतला असता, येथील विदारक परिस्थिती उघड झाली. विहिरीमध्ये थेंबथेंब साठणारे पाणी घेण्यासाठी गावपाड्यांचे रहिवासी मध्यरात्रीपासूनच नंबर लावतात.
कोळीपाड्यासाठी गावाच्या बाजूला एक विहीर बांधली खरी; मात्र या विहिरीतील पाणी दिवाळीदरम्यानच संपले. तेव्हापासूनच या पाड्याचा पाण्यासाठीचा वनवास सुरू झाला. आजमितीस या पाड्यातील नागरिक जे पाणी पितात, ते पाहून कुणाचेही काळीज धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.
या पाड्याच्या बाजूला इमारतीच्या कामासाठी बांधला जातो तसा लहानसा हौद आहे. यातील गुडघाभर पाण्यात बेडूक मरण पावले आहेत. हे हिरवेगार दुर्गंधीयुक्त पाणी झिरपून १०० मीटर अंतरावरील एका दगडाच्या कपारीतून बाहेर येते. हे पाणी पेल्यापेल्याने घेऊन आपला हंडा भरण्याचे काम येथील महिला करतात. हेच पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात.
वापरण्यासाठी तर अतिशय घाणेरडे पाणी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केवळ निवडणुकीच्यावेळी आमची आठवण राजकारणी लोकांना होते. नंतर, मात्र आमच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
तालुक्यातील सर्व गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटावा, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, त्यांना तत्काळ टँकरने पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
- पांडुरंग बरोरा, आमदार, शहापूर
आमच्या गावात पाण्याची भीषण पाणीटंचाई असून हंडाभर पाण्यासाठी मध्यरात्रीपासूनच विहिरीवर ठाण मांडावे लागते. पाण्यासाठीच दिवसरात्र घालवावा लागत असल्याने त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या कामधंद्यावर होत आहे. - भारती कैलास जाधव,
ग्रामस्थ, कोळीपाडा