सोने चोरी प्रकरणातील मालक अडचणीत , दागिने साडेआठ किलोे : विमा भरपाई त्रासाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:30 AM2017-10-10T02:30:17+5:302017-10-10T02:30:33+5:30
दुकानातील सोने लॉकरमधून चोरीला गेले तरच विम्याची भरपाई मागता येते, असा नियम असल्याने अंबरनाथला शोकेसमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर पडलेल्या दरोड्यातील दुकानमालक अडचणीत आल्याची
अंबरनाथ : दुकानातील सोने लॉकरमधून चोरीला गेले तरच विम्याची भरपाई मागता येते, असा नियम असल्याने अंबरनाथला शोकेसमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर पडलेल्या दरोड्यातील दुकानमालक अडचणीत आल्याची चर्चा आहे. या दरोड्याबाबत विमा कंपनी काय भूमिका घेते त्याकडे ज्वेलर्सचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या दरोड्यात लुटले गेलेले सोने साडेआठ किलो असल्याचे प्रत्यक्ष मोजणीनंतर निष्पन्न झाले.
अंबरनाथच्या सागर ज्वेलर्स या दुकानातून रविवारी दुपारी ८.५ किलो सोने चोरट्यांनी लंपास केले. चोरट्यांनी दुकानाच्या मागच्या दाराने प्रवेश केला आणि शोकेसमध्ये लावून ठेवलेले दागिने चोरले. ८ किलो ३०० ग्राम सोने आणि दोन लाखांचे चांदीचे बिस्कीट चोरीला गेले आहे. दिवसा जेवणाच्या वेळेत ही चोरी झाल्याने सर्व दागिने शोकेसमध्ये तसेच होते. ते लॉकरमध्ये ठेवलेले नव्हते. त्यामुळे मालक महेंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुकानातील सोन्याचा विमा असूनही त्यांना त्याचा कितपत फायदा मिळतो, याकडे सराफांचे लक्ष आहे. ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्याचा विमा काढतांना काही ठळक बाबी निश्चित केलेल्या असतात. त्यात महत्वाचे म्हणजे रात्री दुकान बंद झाल्यावर दुकानातील लॉकरमध्ये सर्व सोने ठेवणे गरजेचे असते. लॉकर तोडून सोने लुटल्यासच विम्याची भरपाई मिळते. कारण दुकानातील लॉकर आणि त्यांची सुरक्षा पाहूनच कंपनी सोन्याला विम्याचे संरक्षण देते. दुकानावर दरोडा पडला, तरी भरपाई मिळते. पण सागर ज्वेलर्समध्ये शोकेसमध्ये ठेवलेले दागिने चोरल्याचा प्रकार घडला आहे.
चोरटा कॅमेºयात कैद-
चोरट्यांपैकी एका चोरट्यानेच दुकानात प्रवेश केला. इतर त्याचे साथीदार हे दुकानाबाहेर पहारा देत होते. दुकानात शिरलेल्या चोरट्याने सुरुवातीला तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे त्याची ओळख पटणे शक्य नव्हते. पण याच चोरट्याने सोने चोरल्यावर दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर बंद करण्याचा प्रयत्न केला.
डीव्हीआरऐेवजी चोरट्याने घाईत संगणकाचा प्लग काढला. सीसीटीव्ही बंद झाले असले असे समजून त्याने तोंडावरील मास्क काढून टाकला. त्यामुळे त्याचा चेहरा कॅमेºयात कैद झाला.
दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी जैन यांना मोबाईलमधूनही करता येत होती. पण जैन यांनी आपले दोन्ही मोबाईल दुकानातच चार्जिंगसाठी ठेवले होते. ते मोबाईलही चोरट्यांनी लंपास केले आहेत.