मालक, सुपरवायझरला अटक आणि सुटका, कामगाराची प्रकृती सुधारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:09 AM2017-11-24T03:09:05+5:302017-11-24T03:09:22+5:30
डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी फेज-२ मधील अॅल्यू फिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक नीलय घोलकर आणि सुपरवायझर जोखम राय यांच्याविरोधात हलगर्जी आणि निष्काळजी केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला होता.
डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी फेज-२ मधील अॅल्यू फिन कंपनीत सोमवारी झालेल्या कॉम्प्रेसर स्फोटप्रकरणी कंपनीचे मालक नीलय घोलकर आणि सुपरवायझर जोखम राय यांच्याविरोधात हलगर्जी आणि निष्काळजी केल्याचा गुन्हा मानपाडा पोलिसांनी दाखल केला होता. त्यामुळे बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. मात्र, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
अॅल्यू फिन कंपनीत सोमवारी सकाळी ८.३० ते ८.४५ च्या दरम्यान कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यात कंपनीमधील दोन कामगार जखमी झाले होती. यात कमरेपासून डावा पाय पूर्णत: निखळल्याने गंभीर जखमी झालेल्या जावळे यांच्यावर नजीकच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रारंभी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली. तसेच कंपनीचे मालक घोलकर आणि सुपरवायझर राय यांच्याविरोधातही अटकेची कारवाई करण्यात आली.