भाडेकरुच्या घराचा बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या मालकाला दणका: तिघांचा जामीन फेटाळला
By जितेंद्र कालेकर | Published: November 22, 2020 07:38 PM2020-11-22T19:38:37+5:302020-11-22T19:42:02+5:30
घराचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन घरातील संगणकासह एक लाख ४५ हजारांच्या ऐवजाच्या चोरीचा आरोप असलेल्या पाच ते सहा जणांपैकी दर्शन कोळी (५०) त्याची बहिण श्रृंखला बाडकर (४०) आणि मेव्हणे अमित बाडकर (४५) या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भाडेकरुच्या घराचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन घरातील संगणकासह एक लाख ४५ हजारांच्या ऐवजाच्या चोरीचा आरोप असलेल्या पाच ते सहा जणांपैकी दर्शन कोळी (५०) त्याची बहिण श्रृंखला बाडकर (४०) आणि मेव्हणे अमित बाडकर (४५) या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणेन्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे. यातील ग्रिष्मा कोळी यांनी मात्र वयाची सत्तरी गाठल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
नौपाडयातील वीर सावरकर पथ येथील ‘दर्शन बिल्डींग’ या इमारतीमधील तिसºया मजल्यावरील क्रमांक ११ मधील खोली रवींद्र वैद्य (४५) यांनी भाडे तत्वावर घेतली आहे. मात्र, ३ ते ५ सप्टेंबर २०२० रोजी दरम्यान ग्रीष्मा कोळी तसेच त्यांचा मुलगा दर्शन कोळी, मुलगी श्रृंखला बाडकर आणि जावई अमित बाडकर यांनी आपसात संगनमत केले. त्यानंतर या खोलीच्या लाकडी दरवाजाचे आणि सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत शिरकाव केला. तसेच खोलीतील संगणक आणि ट्रॉली, लोखंडी पलंग तसेच रोजच्या वापरातील भांडी असा एक लाख ४५ हजारांचा ऐवज चोरल्याची तक्रार वैद्य यांनी २० आॅक्टोबर २०२० रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. वैद्य यांना कोळी आणि बाडकर कुटूंबियांनी शिवीगाळ आणि धमकी देऊन बेकायदेशीररित्या खोलीत शिरकाव करुन अतिक्रमण करीत खोलीचा कब्जा घेतल्याचेही या तक्रारीमध्ये म्हटले होते. याप्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर यांनी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी आरोपींनी ठाणे न्यायालयात अर्ज केला. तेंव्हा आरोपींनी आपण मालक असल्याचा दावा केला. तर तक्रारदार वैद्य यांनी १९७६ पासून भाडेकरु असून लाईटबिल, भाडे आणि मेटनन्सचा भरणा करीत असल्याचे म्हटले. मालकाने बेकायदेशीररित्या घरात शिरकाव करुन वस्तूंचीही चोरी केल्याचा त्यांनी दावा केला. न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ७० वर्षीय ग्रीष्मा कोळी वगळता इतर तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज २० नोव्हेंबर रोजी फेटाळला. इमारत जुनी असून रवींद्र वैद्य यांचे वडीलही त्याच खोलीत वास्तव्याला होते. अशा सर्व बाबी सरकारी वकील संध्या जाधव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. यातील आरोपींना नौपाडा पोलिसांनी आता नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.