समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मालकी हक्काची घरे - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:21 PM2017-08-30T23:21:12+5:302017-08-30T23:21:25+5:30
समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळावीत, यासाठी विशेष योजना आखण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
ठाणे : समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र राबणा-या पोलिसांना मालकी हक्काची घरे मिळावीत, यासाठी विशेष योजना आखण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
कासारवडवली आणि कळवा पोलीस ठाण्यांच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेचा मुद्दा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मांडला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्याचा उल्लेख केला. वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या इमारती अतिशय धोकादायक अवस्थेत आहेत. त्यांचा पुनर्विकास करून पोलिसांना मालकी हक्काने कायमस्वरूपी घरे कशी देता येतील, यादृष्टीने योजना आखण्याच्या सूचना त्यांनी पोलीस महासंचालकांना केल्या.
ठाण्याचे पालकमंत्री, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी यासाठी पुढाकार घेऊन सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांचाही या योजनेमध्ये समावेश करावा. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचाही लाभ घेता येईल. ठाण्याच्या धर्तीवर ही योजना राज्यभरात राबविता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
वर्तकनगर पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आवर्जून उल्लेख करून, ही समस्या सोडविण्याची त्यांनी ग्वाही दिली.
कासारवडवली आणि कळवा पोलीस ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर उभारण्यात आले. त्यासाठी विकासकाला कन्स्ट्रक्शनस् टीडीआर (बांधकाम खर्चाच्या मोबदल्यात दुसरा भूखंड देणे) देण्यात आला. हा प्रयोग अतिशय चांगला आहे. अनेक शहरांमध्ये पोलीस ठाण्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यामुळे अशा प्रकारची कल्पक योजना राबवून राज्यभरातील पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारती बांधता येतील. संबंधित विभागांना यासंदर्भात सूचना केल्या जातील, असे सूतोवाच त्यांनी केले.
प्रशासकीय कामासाठी ठाण्यात येणाºया मुंबई आणि इतर ठिकाणच्या पोलीस अधिकाºयांसाठी राहण्याची सोय नसते. पोलीस ठाण्यांच्या नवीन इमारतींमुळे आता ती गैरसोय दूर होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आॅनलाईन पोलीस ठाण्याच्या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्तुती केली. पुण्यात ई-कम्प्लेन्टची सुविधा असल्याने नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याची गरजच राहत नाही. ही योजना राज्यभर राबविण्याची सूचना त्यांनी याप्रसंगी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना केली.
ठाणे शहर सर्वांगाने उत्तम बनविण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यानंतर पवारनगर मनपा शाळेच्या मध्यान्ह भोजन योजनेचे उद्घाटन त्यांनी केले.