शैक्षणिक, सामाजिक संस्थांची महापालिकेला ऑक्सिजन मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:43+5:302021-04-27T04:41:43+5:30
मीरारोड : मीरा - भाईंदर महापालिकेच्या कोविड उपचार केंद्रात दाखल रुग्णांसाठी सामाजिक व शैक्षणिक संस्था ऑक्सिजनच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. ...
मीरारोड : मीरा - भाईंदर महापालिकेच्या कोविड उपचार केंद्रात दाखल रुग्णांसाठी सामाजिक व शैक्षणिक संस्था ऑक्सिजनच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.
शहरात शाळा, महाविद्यालये चालवणारे राहुल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष लल्लन तिवारी, सचिव राहुल तिवारी व कृष्णा तिवारी यांनी ऑक्सिजनचे ५० सिलिंडर दिले आहेत. २३ हजार लीटर हे सिलिंडर आवश्यकता वाटेल तेव्हा संस्था पुन्हा भरून देणार आहे. यावेळी आयुक्त दिलीप ढोले, प्रभारी नगररचना सहाय्यक संचालक दिलीप घेवारे, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव उपस्थित होते.
याशिवाय मेकिंग द डिफरन्स या सामाजिक संस्थेने पंडित भीमसेन जोशी रुग्णालयास ७० हजार लीटर ऑक्सिजन असलेले १० सिलिंडर दिले आहेत. संस्थेचे अध्यक्ष दीपक विश्वकर्मांसह शीतलाशंकर तिवारी, गोपाळ रायठ्ठा, निश्चल पारेख, सुनीता भारती, रितेश व्ही. आदी यावेळी उपस्थित होते. याआधी मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाला ७० हजार लीटर ऑक्सिजन दिला असून, राज्यात कॉन्संट्रेटर देणार असल्याचे विश्वकर्मा म्हणाले.
आयुक्तांनी या दोन्ही संस्थांचे आभार मानून कोरोनाच्या संकट काळात सामाजिक संस्थांनी दिलेला मदतीचा हात दिलासादायक असल्याचे म्हटले आहे.