ऑक्सिजन सेंटर रुग्णांसाठी ठरतेय जीवनदान; भिवंडीतील मक्का मशीद ट्रस्टचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 02:06 AM2020-06-28T02:06:49+5:302020-06-28T08:18:06+5:30
कोरोनाग्रस्तांना दिलासा : इतर रुग्णांवरही होतात उपचार
भिवंडी : शहरातील शांतीनगर भाजी मार्केट परिसरात जमात ए इस्लाम ए हिंद मशीद ट्रस्ट अंतर्गत असलेल्या मक्का मशीद ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजन सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारपणातील रुग्णांना आवश्यक असलेले ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सेंटरमध्ये उपलब्ध आहे.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या २ हजार २४६ वर पोहचली असून १०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या भीतीने शहरातील अनेक खासगी रुग्णालये रुग्णांवर उपचार करत नाहीत. अनेक अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालये तपासणी न करता दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत असल्याने रुग्णालयांच्या पायºया झिजवण्यातच अनेक रुग्णांना आपल्या जीव गमवावा लागत आहे. रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता शांतीनगर येथील मक्का मशिदीने रुग्णांसाठी आॅक्सिजन सेंटर उभारले आहे. हे सेंटर रुग्णांसाठी मोफत सुविधा पुरवत आहे. सेंटरमध्ये सर्व जातीधर्माच्या रुग्णांवर आॅक्सिजन उपलब्ध करून उपचार केले जात आहेत.
१८ जूनपासून सेंटर २४ तास सुरु आहे. जोपर्यंत रुग्णांना रुग्णालय उपलब्ध होत नाही तोपर्यंत या रुग्णांना सेंटरमध्येच ठेवले जाते. सध्या ५ खाटा व ८ आॅक्सिजन सिलिंडर उपलब्ध असून २ नेबिलायझर उपलब्ध आहेत.
सध्या सेंटरमध्ये ४ ते ५ डॉक्टर असून ७ वैद्यकीय कर्मचारी व डॉ. सलीम शेख, डॉ. सर्फराज खान हे दोन डॉक्टर येथे २४ तास उपलब्ध आहेत. ज्या रुग्णांना सेंटरपर्यंत येता येत नाही किंवा ज्या रुग्णांना आॅक्सिजनची जास्त आवश्यकता आहे अशा रुग्णांना घरी जाऊन ट्रस्टच्या वतीने आॅक्सिजन पुरविण्यात येत आहेत. त्यासाठी ३० छोटे आॅक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत.