Coronavirus: ठाण्यात ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढली; दोन प्रकल्पांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:18 PM2021-04-25T23:18:31+5:302021-04-25T23:18:43+5:30
दोन प्रकल्पांचे नियोजन : शासकीय, खासगी रुग्णालयांनाही पुरेसा पुरवठा सुरू असल्याचा दावा
अजित मांडके
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम अधिक दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यावर ऑक्सिजन तुटवड्याची वेळ आली होती. परंतु यामध्ये सुदैवाने काही हानी झालेली नाही. परंतु आता या तुटवड्यावर मात करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार दोन ठिकाणी ऑक्सिजन निर्मितीचे प्लान्ट उभारण्याचे पालिकेने निश्चित केले असून त्याचे कामही सुरु झाले आहे. शिवाय रोजच्या रोज पुरेसा ऑक्सिजनचा साठा आता उपलब्ध होऊ लागला आहे. तर खाजगी रुग्णालयांनाही आता पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध झाला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढल्याचे दिसून आले आहे.
महापालिका हद्दीत आतापर्यंत १ लाख १२ हजार ७६९ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. तर ९७ हजार ९० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मातही केली आहे. शहरात आतापर्यंत १ हजार ५९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १४ हजार १४२ एवढी आहे. दोन महिन्यांपासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. रोज १२९९ ते १५०० रुग्ण सध्या शहरात आढळत आहेत. पहिल्या लाटेत हेच प्रमाण रोजचे १०० ते ३०० च्या आसपास होते. मृत्यूदर काहीसा वाढल्याचे दिसत आहे. त्यातही सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या १४ हजार १४२ रुग्णांपैकी १० हजार २९२ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. तर ३ हजार ४११ रुग्ण हे विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यामध्ये १८२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ६५२ रुग्ण क्रिटिकल आहेत. तर ४७० रुग्ण हे आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबरच खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा जवळजवळ संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसत होते. शहरात आजच्या घडीला २५० खाजगी रुग्णालये आहेत. त्यातील २५ खाजगी कोविड रुग्णालये आहेत. तर ५० नॉन कोविड रुग्णालयातही कोविड संशयित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे शहरातील ७५ खाजगी रुग्णालयांना सध्या ऑक्सिजन मिळावा यासाठी धावपळ करावी लागत आहे.
शहरातील या खाजगी रुग्णालयांना रोज ६८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. तर महापालिकेच्या कोविड रुग्णालयांना ४६ मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. पहिल्या लाटेत मात्र यापेक्षा अर्ध्या प्रमाणातच ऑक्सिजन लागत होते. त्यातही प्रत्येक रुग्णालयात रोजच्या रोज शिल्लकही राहत होता. परंतु आता दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठाही दुपटीने वाढला आहे. रोज पुरवठा होत असल्याने रुग्णांलयाकडे शिल्लक साठा नाही. परंतु सध्या पुरेसा साठा असल्याचे पालिका, खाजगी रुग्णालयांकडून सांगण्यात येत आहे.
-संबंधित वृत्त/४