Oxygen: ७ रुग्ण आणि ठाणे मनपाने दिले २ ऑक्सिजन सिलेंडर; शेवटच्या क्षणी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:51 PM2021-04-27T22:51:18+5:302021-04-27T22:54:00+5:30

 ठाणे महापालिकेकडून केवळ दोन ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा, मात्र हे ऑक्सिजन सिलेंडर अर्ध्या तासांपेक्षा अधिक वेळ चालणारे नसल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने या रुग्णांना गोकुळनगर येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.  

Oxygen: Dia Hospital patient shifted to another hospital due to lack of oxygen at Thane | Oxygen: ७ रुग्ण आणि ठाणे मनपाने दिले २ ऑक्सिजन सिलेंडर; शेवटच्या क्षणी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं

Oxygen: ७ रुग्ण आणि ठाणे मनपाने दिले २ ऑक्सिजन सिलेंडर; शेवटच्या क्षणी रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवलं

googlenewsNext
ठळक मुद्देघोडबंदर भागात वाघबीळ येथे ४२ बेडचे रुग्णालय असून या रुग्णालयात ३५ रुग्ण सध्या उपचारार्थ दाखल आहेत. या ठिकाणी २८ ऑक्सिजनचे बेड असून त्यातील ७ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल होते. २५ सिलेंडर मिळतील अशी शक्यता त्यांना वाटत होती. परंतु रात्री ८ वाजेर्पयत त्यांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकले नाही

ठाणे  : वर्तक नगर भागात असलेल्या वेंदात हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजन अभावी चार जणांचा मृत्यु झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांना केला असल्याची घटना ताजी असतांनाच मंगळवारी घोडबंदर भागातील दिया या खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने या रुग्णालयातील ७ रुग्णांना त्यांच्याच गोकुळनगर येथील युनिवर्सल रुग्णालयात हलवण्यात आले. ऑक्सिजनचा साठा संपत आल्यानंतर यासंदर्भात ठाणे महापालिकेला कळवण्यात आल्यानंतर ठाणे महापालिकेच्या वतीने केवळ दोन ऑक्सिजनचे सिलेंडर देण्यात आले. मात्र हे ऑक्सिजन सिलेंडर अर्ध्या तासांपेक्षा अधिक वेळ चालणारे नसल्याने अखेर रुग्णालय प्रशासनाने या रुग्णांना गोकुळनगर येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. 

घोडबंदर भागात वाघबीळ येथे ४२ बेडचे रुग्णालय असून या रुग्णालयात ३५ रुग्ण सध्या उपचारार्थ दाखल आहेत. या ठिकाणी २८ ऑक्सिजनचे बेड असून त्यातील ७ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल होते.  या रुग्णालयातील ऑक्सीजनचा साठा  संपत आल्याने चार तास आधीच त्यांनी या संदर्भात महापालिकेशी संपर्क साधून त्यांना रुग्ण हलविण्याची मागणी केली. तसेच संबधित रुग्णालयातील काही कर्मचारी देखील ऑक्सिजन सप्लायरकडे गेल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. २५ सिलेंडर मिळतील अशी शक्यता त्यांना वाटत होती. परंतु रात्री ८ वाजेर्पयत त्यांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकले नाही. त्यानुसार आयसीयुमधील एका रुग्णाला सांयकाळी ६ च्या सुमारास दुसऱ्या  रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु उर्वरीत ६ रुग्णांना रात्री ८ वाजेर्पयत हलविण्यात आले नव्हते.

ठाणे महापालिकेने मात्र या रुग्णालयाला केवळ दोन ऑक्सिजनचे सिलेंडर दिले. मात्र हे सिलेंडर केवळ अर्ध्या तासांपेक्षा जास्त चालणार नव्हते. परिणामी रुग्णांना त्यांच्याच गोकुळनगर येथील रुग्णायात हलवण्यात आले असल्याची माहिती डॉ. केदार यांनी दिली आहे. गोकुळ नगर येथील रुग्णालयातही ऑक्सिजनचा साठा पुरेसा नसल्याने या ठिकाणी देखील परिस्थिती गंभीर होण्याची परिस्थिती आहे. दरम्यान, या संदर्भात महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते स्वत: तुर्भे येथील ऑक्सिजनच्या प्लान्टला जातीने दोन तासापासून थांबले होते. तसेच रात्री ७.५० च्या सुमारास संबधित खासगी रुग्णालयाच्या गाडीत ऑक्सिजन भरण्यास सुरवात झाल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही खासगी रुग्णालयामध्ये समन्वयाची भुमिका बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र दिया रुग्णालयात पुरेसा साठा उपलब्ध न झाल्याने अखेर रुग्णांना गोकुळ नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे दिया रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Oxygen: Dia Hospital patient shifted to another hospital due to lack of oxygen at Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.