ऑक्सिजन, रेमडेसिविर, लसही वेटिंगवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:11 AM2021-04-18T00:11:26+5:302021-04-18T00:11:37+5:30
ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच साठा
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये केवळ एक दिवसाचाच साठा शिल्लक असून, खासगी रुग्णालयांना अद्यापही रेमडेसिविर मिळालेले नाही. दुसरीकडे, ठाणे महानगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्येही केवळ एक दिवसाचाच साठा शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही कोरोनापासून रोखण्यासाठी लसीकरण सुरू असले तरी ठाणे महापालिकेकडे पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यामुळे आता महापालिकेची आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर आली असून ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि लसही वेटिंगवर आहे.
ठाणे शहरात १ लाख ३०६ कोरोना रुग्ण असून, आतापर्यंत ८३ हजार ८९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १५३३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्याच्या घडीला १६ हजार ४४५ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे कोविड सेंटरदेखील आता अपुरे पडू लागले आहेत. अशातच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये अद्यापही ऑक्सिजनचा पुरवठा मिळालेला नाही. ग्लोबललादेखील एक दिवसापुरताच ऑक्सिजनचा साठा असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. महापालिकेसह शहरातील विविध खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेन्टीलेटरवर ६५३ रुग्ण असून त्यातील ६३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. परंतु, या सर्वच रुग्णांना आता ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. दुसरीकडे, खासगी कोविड रुग्णालयांनादेखील कुणी ऑक्सिजन देता का ऑक्सिजन, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ठाणे शहराला रोज ११४ मेट्रीक टन ऑक्सिजनची सध्या गरज भासत आहे. परंतु, साठा मात्र उपलब्ध होताना दिसत नाही. त्यात ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरला ४६ मेट्रीक टन रोजच्या रोज ऑक्सिजन लागत असून त्यातील रोज २० मेट्रीक टनचाच पुरवठा महापालिकेला होत आहे. दुसरीकडे, शहरातील खासगी रुग्णालयांना रोजच्या रोज ६८ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असून त्यातील ६० मेट्रीक टन कसाबसा उपलब्ध होत आहे. आता तासातासाला खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात येत असल्याने या सर्वांची निकड कशी भागवायची असा पेच आता यंत्रणेपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे ठाणे महापालिका हद्दीतील खासगी कोविड रुग्णालयांना अद्यापही रेमडेसिविरचा पुरवठा होऊ शकलेला नाही.
दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल कोविड सेंटरमध्ये पुरवून पुरवून रेमडेसिविरचा वापर केला जात आहे. सध्या येथे केवळ ६५० च्या आसपास रेमडेसिविर उपलब्ध असून तो साठा एक दिवसपुरताच असून मागणी करूनही साठा उपलब्ध होत नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
लसीकरणाचा अतिरिक्त साठा उपलब्ध झाला असला तरीतोदेखील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शहरातील ५६ पैकी केवळ ४१ केंद्रांवरच लसीकरण सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
ऑक्सिजन -११४ मेट्रिक टनची मागणी, मिळतो ८० मेट्रिक टनच
ठाणे महापालिका हद्दीत महापालिकेच्या कोविड सेंटरबरोबर खासगी रुग्णालयात रोजच्या रोज किमान ११४ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. परंतु, शहरासाठी रोज सुमारे ८० मेट्रीक टनचा ऑक्सिजनचा साठा मिळत आहे. पालिकेच्या गोल्बल कोविड सेंटरमध्ये रोजच्या रोज ४६ मेट्रीक गरज असताना येथे २० मेट्रीक टनच पुरवठा होत आहे. त्यामुळे पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये अद्यापही ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही.
रेमडेसिविर - मागणी २ हजार, मिळाले एकही नाही
ठाणे महापालिका हद्दीत रोजच्या रोज सुमारे २ हजार रेमडेसिविरची गरज आहे. परंतु, पालिकेकडे आता पुरवून पुरवून ६५० च्या आसपास रेमडेसिविरचा साठा शिल्लक राहिला आहे. महापालिकेने रोजच्या रोज १५०० रेमडेसिविरची मागणी केली आहे. तर खासगी रुग्णालयांसाठी ५०० च्या आसपास मागणी रोजची आहे. परंतु, खासगी रुग्णालयांना मागील आठ दिवसांपासून साठाच उपलब्ध झालेला नाही, तर महापालिकेलाही साठा उपलब्ध झालेला नाही.
लसीकरण - साठा नसल्याने केवळ ४१ केंद्रे सुरू
ठाणे महापालिकेला यावेळी ३५ हजारांचा लसींचा साठा मिळाला आहे. त्यानुसार हा साठादेखील योग्य पध्दतीने वापरण्याचे पालिकेचे नियोजन आहे. यापूर्वी पुरेसा साठा असताना पालिकेच्या माध्यमातून ५६ केंद्रावर लसीकरण सुरू होते. परंतु, आता पालिकेकडे कोवीशिल्डचा १४ हजार ८७० आणि कोव्हॅक्सीनचा ३ हजार डोसचा साठा शिल्लक असल्याने पालिकेने सध्या ४१ केंद्रांवरच लसीकरण सुरू ठेवले आहे.
पुढे काय?
ठाणे शहरात सध्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे, एक एक दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध होत आहे, रेमडेसिविरचा साठादेखील जवळजवळ संपुष्टात आला आहे. लसीकरणाचा साठादेखील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच असल्याने पुढे काय, असा सवाल आता पालिकेला पडला असून साठा उपलब्ध व्हावा यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. ठाणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, केवळ ग्लोबल रुग्णालयापुरताच रोजच्या रोज साठा उपलब्ध होत आहे. तर रेमडेसिविरचा साठादेखील एक दिवसापुरताच शिल्लक असून १८ एप्रिलनंतर साठा उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आहे त्या साठ्यावर सध्या काम सुरू आहे.
- अश्विनी वाघमाळे, उपायुक्त, ठामपा