‘प्लाझा’ सेंटरमधील ऑक्सिजन साठा संपल्याने ‘ग्लोबल’ वरील वाढला ताण, नागरिक व्होल्टास कोविड सेंटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 01:20 AM2021-04-12T01:20:59+5:302021-04-12T01:21:24+5:30
Oxygen ; ठाणे शहरात ९४ हजार २६ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत, तर आतापर्यंत ७७ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
ठाणे : महापालिकेच्या पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा अखेर संपला असल्याचे महापालिकेने मान्य केले आहे. परंतु शनिवारी रात्री वेळीच रुग्णांना हलविण्यात आले नसते तर वाईट परिस्थिती ओढावली असती. त्यामुळे पालिकेचे त्यासाठी कौतुक करावे लागणार आहे. परंतु आता पार्किंग प्लाझा येथील रुग्ण ग्लोबलला हलविण्यात आल्याने तेथेही ताण वाढला आहे.
तसेच तेथील ऑक्सिजनची क्षमताही कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्याने महापालिकेचे व्होल्टास येथील कोविड सेंटरही अद्याप सुरू करण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने यात लक्ष घालून महापालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
ठाणे शहरात ९४ हजार २६ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत, तर आतापर्यंत ७७ हजार ३८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एक हजार ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्याच्या घडीला १५ हजार १९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेचे कोविड सेंटरही आता अपुरे पडू लागले आहे.
अशातच पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात आल्याने येथील २६ रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. परंतु दुसरीकडे ग्लोबल रुग्णालयावरील ताण वाढला
आहे. त्यातही रविवारीही पालिकेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही, त्यामुळे पार्किंग प्लाझा येथील ऑक्सिजनचे बेड सुरू झालेले नाहीत. पालिकेने संबंधित कंपनीकडे मागणी करूनही पालिकेला आवश्यक त्या प्रमाणात साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही.
रोज लागतात ४६ ऑक्सिजन सिलेंडर
कल्याण- डोंबिवली या भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येथील रुग्ण ठाणे महापालिकेच्या कोविड सेंटरकडे धाव घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सेंटरवरील ताण वाढू लागला आहे. परंतु ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होऊ शकत नसल्याने ग्लोबलमधील साठा संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयासाठी २० केएल रोज ऑक्सिजनची गरज लागते, तर पार्किंग प्लाझा येथे १३ आणि व्होल्टासलाही १३ केएलची ऑक्सिजन सिलेंडरची गरज रोजच्या रोज लागते.
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आयनॉक्सशी पालिकेने केला पत्रव्यवहार
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयांना द्रव्य स्वरूपातील ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पालिकेने आयनॉक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीशी शनिवारी पत्रव्यवहार केला. बाळकूम येथील ग्लोबल हब कोविड रुग्णालय, ज्यूपिटर हॉस्पिटलजवळील पार्किंग प्लाझा कोविड रुग्णालय आणि पोखरण रोड येथे लवकरच सुरू होणारे व्होल्टास फॅसिलिटी सेंटर यासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती महानगरपालिकेने आयनॉक्स कंपनीला केली आहेे. ग्लोबल हबला दोन दिवसांतून तीन वेळा २० केएल तर पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास फॅसिलिटी सेंटरला अनुक्रमे १३ केएल ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी पालिकेने केली आहे.