स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग, शिवसेनेकडून अनेक नावे पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 03:35 AM2018-04-08T03:35:29+5:302018-04-08T03:35:29+5:30
राज्यात युतीसाठी भाजपाने शिवसेनेला टाळी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर ठाण्यातही युतीची विस्कटलेली घडी सावरण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
ठाणे : राज्यात युतीसाठी भाजपाने शिवसेनेला टाळी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर ठाण्यातही युतीची विस्कटलेली घडी सावरण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेकडून स्थायी समिती सभापतीपदासाठी अनेक नावे आता पुढे येऊ लागली आहेत. भाजपाने एक वर्ष स्थायी समिती आणि एक वर्ष नौपाडा प्रभाग समिती मिळावी, असा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता शिवसेना काय निर्णय करते याकडे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी शिवसेनेने काँग्रेसला हाताशी धरून स्थायी समितीची गणिते आखली होती. त्यानुसार, काँग्रेसचा एक सदस्य हा त्यांनी स्थायी समितीत घेतला होता. परंतु, पक्षाला विश्वासात न घेता, काँग्रेसचे यासीन कुरेशी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने इतर दोन नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त करून थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याने ऐनवेळी काँग्रेसने पाठिंबा देण्यास नकार दिला. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असताना एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पीठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. याविरोधात राष्टÑवादीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे मागीला दीड वर्षापासून ती गठीत होऊ शकली नाही. आता नव्या आर्थिक वर्षात शिवसेनेने पुन्हा स्थायी गठीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या. राज्यात आता युतीमधील सौहार्दाचे वारे वाहू लागले असून भाजपाने टाळी देण्यासाठी एक हात पुढे केला आहे. शिवसेनेने जरी अद्याप निर्णय जाहीर केला नाही. लोकसभा निवडणुकीत युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युती झालीच तर स्थायी समितीच्या चाव्या आपसूक शिवसेनेच्या हाती येणार आहेत. मागील कित्येक वर्षांचा इतिहास तपासला तर, शिवसेनेने प्रत्येक वेळेस एक वर्ष स्थायी समितीच्या चाव्या भाजपाला देऊ केल्या आहेत. त्यानुसार यावेळी शिवसेनेनी एक वर्ष स्थायीचे सभापतीपद द्यावे, ही भाजपाची अपेक्षा आहे. नौपाडा प्रभाग समितीवर सेनेचा वरचष्मा आहे.
नव्याने सदस्यांची निवड होण्याची शक्यता...
युती झाली तर शिवसेनेला किमान एक वर्षासाठी तर भाजपाला सभापतीपद द्यावे लागणार, हे निश्चित मानले जात आहे. युती झाल्यास पुन्हा नव्याने स्थायी समितीसाठी सदस्यांची निवड केली जाण्याची शक्यता असून यामुळे काँग्रेस मात्र स्थायी समितीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. परंतु, जुनीच नावे कायम ठेवली तर मात्र काँग्रेसच्या यासीन कुरेशी यांना संधी मिळण्याची आशा आहे.
सभापतीपदासाठी
अनेक इच्छुक...
स्थायी समितीची गणिते जुळवण्याच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेतून राम रेपाळे, संजय भोईर, नरेश म्हस्के आणि नरेश मणेरा यांची नावे आता आघाडीवर आहेत. यामध्ये तीन निष्ठावंतांचा समावेश असून भोईर हे राष्टÑवादीतून शिवसेनेत दाखल झाले आहेत. परंतु, त्यांना श्रेष्ठींनी शब्द दिला असल्याने तो ते पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्थायी समितीसाठी
जाहीर झालेली नावे...
शिवसेना- नरेश म्हस्के, नरेश मणेरा, संजय भोईर, राम रेपाळे, शैलेश पाटील, गुरमित सिंग श्यान, विमल भोईर, मालती पाटील आणि काँग्रेसचे यासीन कुरेशी
राष्टÑवादी - नजीब मुल्ला, विश्वनाथ भगत, शानू पठाण, सिराज डोंगरे
भाजपा - मनोहर डुंबरे, नारायण पवार आणि मुकेश मोकाशी.