कल्याण-डोंबिवलीतील लसीकरणाचा वेग मंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:07+5:302021-06-17T04:27:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत जानेवारीत लसीकरणाला सुरुवात झाली असून, १३ लाख ५९ हजार नागरिकांना लस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत जानेवारीत लसीकरणाला सुरुवात झाली असून, १३ लाख ५९ हजार नागरिकांना लस देण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, लसीचे पुरेसे डोस राज्य सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने आतापर्यंत मनपा हद्दीत केवळ १६ टक्केच लसीकरण झाले आहे. लसीच्या पुरेशा डोसअभावी मनपा हद्दीतील लसीकरण मंद गतीने सुरू आहे.
केडीएमसीने जानेवारीत लसीकरणाला सुरुवात केली तेव्हा आरोग्यसेवकांना प्रथम लस दिली गेली. त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. पहिल्या लाटेत ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोनाची जास्त बाधा झाली होती. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्सनंतर लगेच ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू केले; परंतु लस उपलब्ध होत नसल्याने अनेक वेळा लसीकरण स्थगित ठेवावे लागले. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.
राज्य सरकारकडून पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने केडीएमसीने दोन लाख डोस खरेदी करण्याचे ठरविले. त्याकरिता निविदाही काढली आहे. फेरनिविदा काढूनही निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांना निविदा मागविली आहे. निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने, ज्या सोसायट्यांना सशुल्क लसीकरण शक्य आहे, त्यांनी मनपाने मान्यता दिलेल्या ३३ रुग्णालयांशी समन्वय साधून सशुल्क लसीकरण करून घ्यावे, असे धोरणही जाहीर करण्यात आले. त्यानुसार काही मोठ्या सोसायट्यांनी सशुल्क लसीकरण सुरू केले आहे.
-----------------
केवळ १६ टक्केच लसीकरण
१. महापालिका हद्दीत लसीकरणासाठी १३ लाख ५९ हजारांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ १६ टक्केच लसीकरण झाले.
२. पहिला डोस दोन लाख १५ हजार जणांना दिला गेला आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
३. दुसरा डोस केवळ ५१ हजार नागरिकांना देण्यात आला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.
४. लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मनपाने दोन लाख लसींच्या खरेदीसाठी निविदा काढली आहे. तिला अद्याप प्रतिसाद नाही. तसेच खासगी सोसायट्यांमध्ये सशुल्क लसीकरणास मान्यताप्राप्त ३३ रुग्णालयांना केडीएमसीने परवानगी दिली आहे.
------------------
लसीकरण कमी होण्याचे कारण
लसीचे डोस सरकारकडून कमी मिळत असल्याने लसीकरण कमी होत आहे. पुरेसे डोस उपलब्ध झाल्यास लसीकरणाची गती वाढू शकते.
-------------------
कोट
कल्याण-डोंबिवली मनपाने राज्य सरकारकडे १० लाख लसीच्या डोसची मागणी केली आहे. मनपातील १० प्रभाग कार्यालयात प्रत्येकी १० प्रमाणे १०० लसीकरण केंद्रे सुरू करण्याची तयारी आहे. लसीचे पुरेसे डोस उपलब्ध झाल्यास दिवसाला ५० हजार नागरिकांचे लसीकरण करता येऊ शकते.
-डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी
--------------------
पहिला डोस
हेल्थ केअर वर्कर्स-१६,९४२
फ्रंटलाइन वर्कर्स-१५,५४८
१८ ते ४४ वर्षे-५,५०५
४५ ते ६० वर्षे पुढील-१,७७,२३९
एकूण-२,१५,२३४
----------------------
दुसरा डोस
हेल्थ केअर वर्कर्स- ६, ८४४
फ्रंटलाइन वर्कर्स-५, ७९०
१८ ते ४४ वर्षे-२,२१७
४५ ते ६० वर्षे पुढील-३६,४०५
एकूण-५१,२५६
-----------------------