यंत्रमागधारकांना मिळणार पॅकेज
By Admin | Published: March 27, 2017 05:58 AM2017-03-27T05:58:47+5:302017-03-27T05:58:47+5:30
हातमागधारकांना दिलेल्या सवलतींनंतर भाजपाने छोट्या यंत्रमागधारकांना सवलतींचे पॅकेज तयार केले असून १ एप्रिलला त्यांची
पंढरीनाथ कुंभार /भिवंडी
हातमागधारकांना दिलेल्या सवलतींनंतर भाजपाने छोट्या यंत्रमागधारकांना सवलतींचे पॅकेज तयार केले असून १ एप्रिलला त्यांची घोषणा होणार आहे. एकगठ्ठा मतांसाठी या पॅकेजचा पक्षाला फायदा होईल, असे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केलेल्या दौरा फलदायी ठरल्याचे मानले जाते. भिवंडी शहर व परिसरांत सुमारे आठ लाख पॉवरलूम असून त्यापैकी सुमारे सात लाख पॉवरलूमना याचा फायदा मिळेल.
भिवंडी आणि मालेगावच्या निवडणुका पुढे गेल्याचा फायदा उचलत मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवत भाजपाने पारंपरिक पॉवरलूम अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी आणि मालेगाव येथे असे पॉवरलूम मोठ्या संख्येत आहेत. अत्याधुनिक शटललेस पॉवरलूमच्या उत्पादनाच्या गतीने त्यांना कापड उत्पादन घेता येत नाही. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने हातमागाला अनेक सोयीसवलती दिल्या. त्यात छोट्या यंत्रमागाकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून राज्यातील छोट्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन किमान शटललेसच्या काही पटीत कापड उत्पादन मिळावे, यासाठी पॉवरलूमची गती वाढविण्यासाठी ते अपग्रेड करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी त्यावर पारसे काम झाले नाही. त्या संघर्षाची दखल घेत खासदार कपील पाटील यांनी हा विषय इराणी यांच्याकडे मांडला आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली. त्याची अधिकृत घोषणा १ एप्रिलला होणार आहे. या घोषणेमुळे भाजपाला स्थानिक मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी फायदा होईल, असे मानले जाते. आजवर हा मतदार एकसंधपणे भाजपाच्या पाठीशी उभा राहिला नवह्ता. या पॅकेजमुळे प्रथमच भाजपाच्या मतदारांचा विस्तार होईल.
भिवंडीतील झोपड्यांचा होणार पुनर्विकास : प्रकाश मेहता
मुंबई, नागपूर, पुणे आणि ठाणे येथे जाहीर केलेल्या सवलतीप्रमाणेच भिवंडीतही झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू केली जाईल. त्याचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे आहे. तो गृहनिर्माण विभागात आल्यावर त्याला त्वरित मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी रविवारी केली. शहर भाजप कार्यालयात ते बोलत होते.
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून झोपडीवासीयांना दिलासा देण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे. मुंबईप्रमाणेच अन्य शहरातही झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. भिवंडीप्रमाणेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्येही झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती मेहता यांनी दिली.
त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंँग्रेसचे नगरसेवक विकास बाळू पाटील, शिवसेनेच्या कार्यकर्त्या रोहिणी उत्तम जाधव, समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक नासीर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते ईस्तयाक शेख, इम्रान शेख, मोहंमद दाऊद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रसंगी खासदार कपिल पाटील, शहराध्यक्ष संतोष शेट्टी उपस्थित
होते.