पाडव्याचा दीपोत्सव यंदा उशिरा
By Admin | Published: March 8, 2017 04:18 AM2017-03-08T04:18:24+5:302017-03-08T04:18:24+5:30
कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त गुढीपाडव्यांच्या पूर्वसंध्येला होणारा दीपोत्सवाचा कार्यक्रम यंदा उशिरा सुरू होणार आहे.
ठाणे : कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त गुढीपाडव्यांच्या पूर्वसंध्येला होणारा दीपोत्सवाचा कार्यक्रम यंदा उशिरा सुरू होणार आहे. तसेच, स्वागतयात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथांनी समाजाला विचार करायला लावणारेच विषयच मांडावेत, अशी आग्रही सूचनाही करण्यात आली आहे.
स्वागतयात्रेच्या रुपरेषेसंदर्भात सोमवारी कौपीनेश्वर मंदिरातील ज्ञानकेंद्र सभागृहात बैठक झाली. त्यात दीपोत्सवाचा कार्यक्रम सायंकाळी ७ ऐवजी रात्री ८ वाजता होईल, असे जाहीर करण्यात आले. पूर्वसंध्येला मासुंदा तलावाभोवती गंगा आरती ही संकल्पना गेल्यावर्षी राबविण्यात आली. तिला मिळालेला प्रतिसाद पाहता यंदाही गंगा आरती केली जाणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या सामाजिक संस्थांनी केवळ स्वत:च्या संस्थेची माहिती न देता सामाजिक विषयांची मांडणी चित्ररथात करावी, अशी सूचना प्रा. नरेंद्र पाठक यांनी केली. काही संस्था चित्ररथाला व्यावसायिक स्वरुप देतात. यात्रा ही व्यावसायिक नाही. हे व्यासपीठ म्हणजे एक सामाजिक चळवळ आहे त्याचे भान काही संस्था ठेवत नाहीत. चित्ररथ कमी सहभागी झाले, तरी चालतील; परंतु विविध समाजांचा, नागरिकांचा यात सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करावेत. जाती-धर्मापलिकडेही ही यात्रा असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘देहदान’ या विषयावर आधारीत चित्ररथ असेल आणि यात ७५ वर्षांंवरील ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार असल्याचे विनायक जोशी यांनी सांगितले. भगिनी निवेदिता मंडळातर्फे ‘काळानुसार गणेशोत्सवाचे बदलते स्वरुप’ या विषयावर चित्ररथ असेल, अशी माहिती श्वेता गांगल यांनी दिली.
‘विश्वास’ गतिमंद संस्थेची मुले चित्ररथात ‘फुलपाखरु’ हा विषय घेऊन उतरणार असल्याचे संस्थेचे शैलेश साळवी यांनी सांगितले. एसटीविषयी जनजागृती करणारा चित्ररथही सहभागी होणार आहे. श्रुती गांगल यांनी यात्रेनिमित्त महिलांची बाईक रॅली काढण्यात येणार असून यात ८१ महिलांची नोंदणी झाली असल्याचे सांगत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले. प्रेरणा पवार हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ४० स्वयंसेवक सहभागी होणार असल्याचे सांगितले. कळव्यात स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला २७ मार्च रोजी बँड स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची घोषणा आयोजक गोविंद पाटील यांनी केली. प्रत्येक सोसायटीत रांगोळी काढण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्कार भारती यंदा रांगोळीबरोबर कार्यशाळा आयोजित करणार असून ही कार्यशाळा विनामूल्य असणार असेल. रांगोळीत लोकमान्य टिळक हा विषय हाताळला जाणार आहे.
दीपोत्सवासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून एक दिवा आणून तो प्रज्वलित करण्याचे आवाहन सतीश आगाशे यांनी समस्त ठाणेकरांना केले. माझी सोसायटी, माझे कुटुंब, प्लायकार्ड स्पर्धा, १६ वर्षांचा स्वागतयात्रेचा आढावा घेणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशा सूचनाही आाल्याचे कार्यकारिणी सदस्य विद्याधर वालावलकर यांनी सांगितले. यावेळी निमंत्रक अंजली शेळके, सह निमंत्रक कविता वालावलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वसंत विहारला उपयात्रा
दरवर्षीप्रमाणे वसंत विहार कळवा, ब्रह्मांड परिसरात उपयात्रा होणार आहे. दोन वर्षे खंडीत झालेली वसंत विहार येथील उपयात्रा पुन्हा सुरू होणार असून तेथील रहिवाशी या यात्रेत सहभागी होण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती कार्यकारिणी अध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी दिली.
पूर्वसंध्येला चार कार्यक्रम
दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव होतो. यंदा न्यासाने नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. आदल्या दिवशी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत चार कार्यक्रम होणार आहेत. ‘साईकृपा’समोर असलेल्या तलावपाळी परिसरात नृत्याचा कार्यक्रम, चिंतामणी ज्वेलर्स येथील चौकात वादन व जिम्नॅस्टिक्सचे सादरीकरण, मासुंदा तलाव येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ परीक्षित शेवडे यांचे ‘संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान आणि पोवाडा आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती कार्यकारिणीच्या विश्वस्त सचिव डॉ. अश्विनी बापट यांनी दिली.