जिल्ह्यात भातलागवड सुरू; पावसाचा मात्र लपंडाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:04+5:302021-07-07T04:50:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ घेतली आहे. जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ घेतली आहे. जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६५ हजार हेक्टरवर ‘भाताची पेरणी केली. आता त्याचे रोपही चांगले वाढल्याने शेतकऱ्यांनी खाचरात साचलेल्या पाण्यात आता भातलागवडीला सुरुवात केली; पण गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अधूनमधून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसाचा जिल्ह्यात लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? असे विचारण्याची वेळ आली आहे. यामुळे मुरबाडसह कल्याण तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकर्यांनी पीके जगविण्यासाठी बाहेरून पाणी आणून ते शिंपडून धडपड चालविली आहे
तरी दबार पेरणीचे संकट कायम आहजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या भात उत्पादनासाठी महाबीज आणि उत्पादकांमार्फत ११ हजार २८६ क्विंटल बियाण्यांचा वापर केला आहे. या बियाण्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा ११६ अधिकृत विक्रेते जिल्ह्यात आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा १८ गुण नियंत्रण निरीक्षकांच्या देखरेखीखाली सुरू आहे. शिवाय एकूण सहा भरारी पथके नेमून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ठाणे येथील कार्यालयात कृषी निविष्ठा सैनियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या व तक्रारी सोडवल्या जात आहेत.
कोरोनाचा काळ आणि त्यात संचार बंदी असताना यंदाही प्रतिबंधात्मक नियम पाळून बी-बियाणे उपलब्ध केले आहेत. महाबीज आणि खासगी उत्पादकांमार्फत तब्बल चार हजार ५६० क्विंटल बियाणांचा आधीच कृषी सेवा केंद्रांवर पुरवठा केला होता. दर्जेदार बियाणे अगदी वेळेवर मिळाल्यामुळे भातरोपांची वाढही उत्तम झाली. काही शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या खाचरात चिखलणी करून सध्या भातलागवडीच्या कामाला सुरुवात केली. भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर या पाचही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी भातलागवडीला अगदी वेळेवर सुरुवात केली आहे. मात्र, पावसाचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पिकांनी ऊन धरायला सुरुवात केली आहे.
-----------------------