रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने भातशेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:17 AM2020-10-02T00:17:29+5:302020-10-02T00:17:44+5:30
कंपनी प्रशासनावर कारवाई करा : शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी
वाडा : तालुक्यातील कुडूस येथील धोडी केमटेक्स या कंपनीने रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने हे पाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने भातशेती वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणी करून या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत धोडी केमटेक्स प्रा.लि. ही कंपनी असून येथे क्लोरिनपासून पाणी शुद्ध करण्याच्या पावडरचे उत्पादन केले जाते. या कंपनीने रासायनिक सांडपाणी सोडण्यासाठी बनवलेला सेफ्टी टँक हा खूपच लहान असल्याने पाणी साठवून ठेवण्याची त्याची क्षमता कमी असल्याने कंपनी काही वेळा रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडत असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
या रासायनिक पाण्यामुळे वडवली, चिंचघर पाडा, मुसारणे, घोणसई, डाकिवली या गावातील नाल्यालगत असलेल्या शेतजमिनीत हे पाणी जाऊ लागले आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांचे भातपीक धोक्यात आले आहे. तसेच या गावातील गाई, म्हशी या नाल्यातील पाणी पीत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे पाणी त्वरित बंद करून या व अशा अन्य कंपन्यांवर कारवाई करण्याचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, पंचायत समितीचे सभापती योगेश गवा, जि.प. सदस्य राजेश मुकणे, तालुकाप्रमुख उमेश पठारे, पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, राजेश सातवी, रघुनाथ पाटील, तालुका सचिव निलेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
नाल्यात सोडलेले रासायनिक पाणी आमच्या कंपनीतील नाही. कारण कंपनीला संरक्षक भिंत असल्याने पाणी बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही.
- उमाकांत पांडा, कंपनी व्यवस्थापक