ठाणे जिल्ह्यात प्रथमच झाली यंत्राद्वारे भातकापणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:46 AM2020-10-10T00:46:23+5:302020-10-10T00:46:26+5:30
शहापूर येथे झाले प्रात्यक्षिक; वेळ, पैशांची होणार बचत, बळीराजाही सुखावला
ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या लाहे गावातील शेतकरी काशिनाथ भोईर यांच्या शेतावर शुक्रवारी प्रथमच यंत्राद्वारे भातकापणी प्रात्यक्षिक करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम व मजुरीची रक्कम वाचून कमी वेळेत जास्तीतजास्त भाताची कापणी करता येणार असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
जिल्ह्यात आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात यंत्राद्वारे भातकापणी प्रात्यक्षिकासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, शहापूर पंचायत समिती सभापती रेश्मा मेमाने, उपसभापती जगन पष्टे, सदस्य कविता भोईर, कृषी विकास अधिकारी श्रीधर काळे, जिल्हा कृषी अधिकारी डी.बी. घुले, सहायक गटविकास अधिकारी सुशांत पाटील, कृषी अधिकारी विलास झुंजारराव, विलास घुले, सचिन गंगावणे, सरपंच अशोक भस्मा आणि शेतकरी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमार्फत सुधारित कृषी अवजारे योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकरीबांधवांना यांत्रिक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. यामध्ये शेतकºयांना भातलावणी, कापणी, पावर टिलर, पावर विडर, गवतकापणी यंत्र, कडबा कुटी इत्यादी यंत्रे ७५ टक्के अनुदानावर शेतकºयांना कृषी विभागाने दिली आहेत. अन्य यंत्रांप्रमाणे या भातकापणी यंत्राचे जिल्ह्यात प्रथमच प्रात्यक्षिक घेण्यात आले.
अल्प मनुष्यबळात होतात कामे
यांत्रिकीकरणामुळे वेळेची बचत, मजुरीच्या पैशांची बचत, अल्प मनुष्यबळात शेतीची कामे होत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. शहापूर तालुक्यातील शेतकºयांना यामुळे बळ मिळणार असून मजुरी वाढल्याने बहुतेकांनी शेती करणे सोडून दिल्याचे चित्र तालुक्यात होते.