मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे जिल्ह्यात प्रथम
By नितीन पंडित | Published: March 5, 2024 06:09 PM2024-03-05T18:09:41+5:302024-03-05T18:10:08+5:30
या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात सर्वाधिक शाळा असलेल्या ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारली असून या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी संस्थांच्या शाळा अशा दोन गटात शाळांमध्ये राबविण्यात आले.ठाणे जिल्हा हा सर्वाधिक शाळांची संख्या असलेला जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यात ही स्पर्धा अटीतटीची झाली.यामध्ये पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाने बाजी मारली आहे.
सध्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येला गळती लागलेली असताना भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आजही ३१२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.स्पर्धेतील सर्व विषयांच्या गुणांकनात केंद्रस्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तर या तीनही स्तरावर शाळेने प्रथम स्थान मिळवले आहे.संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव,उपाध्यक्षा अरुणा जाधव,शाळा समिती चेअरमन श्रीराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक सुधीर घागस तसेच उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे अभियान यशस्वीरित्या पार पाडले.
शासनाने ठरवून दिलेले सर्व निकष भविष्यातही सुरू ठेवून ते जास्तीत जास्त प्रभावी करण्याचा,विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिकाधिक वाढवण्याचा तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न सातत्याने करणार असल्याचे मुख्याध्यापक सुधीर घागस यांनी सांगितले.शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.