पाडवा, भाऊबीजेकरिता मोबाइल, ज्वेलरीलाच पसंती
By admin | Published: November 12, 2015 01:24 AM2015-11-12T01:24:17+5:302015-11-12T01:24:17+5:30
यावर्षी पाडव्याला पतीने-पत्नीला किंवा भाऊबीजेला भावाने बहिणीला भेट देण्याकरिता सर्वाधिक पसंती ही मोबाईलला दिली आहे.
भाग्यश्री प्रधान, ठाणे
यावर्षी पाडव्याला पतीने-पत्नीला किंवा भाऊबीजेला भावाने बहिणीला भेट देण्याकरिता सर्वाधिक पसंती ही मोबाईलला दिली आहे. त्यानंतर ज्वेलरीचा नंबर लागत असल्याने ठाणे, डोंबिवली व कल्याण येथील मोबाईल स्टोअर्स आणि ज्वेलरी शॉपमध्ये झुंबड उडालेली आहे.
ओवाळणी म्हणून द्यावयाची वस्तू (मोबाईल, ज्वेलरी) खरेदी करण्यासाठी बाजारात पती-पत्नी व भगिनी आणि भाऊराया यांनी गर्दी केली आहे. इलेक्ट्रॉनीक्स वस्तुंमध्ये ठाणे - डोंबिवली शहरांमध्ये सर्वात जास्त पसंती मोबाईल फोन्सला असून ७५ टक्के पतीराज आपल्या पत्नीला मोबाईल गिफ्ट देत असल्याने सध्या मोबाईल शॉपमध्ये पाय ठेवायला जागा नाही. अॅपलच्या महागड्या मोबाईलपासून अगदी साध्या गॅजेट्सची मागणी वाढलेली असल्याचे ठाणे, डोंबिवली, कल्याणमधील दुकानदारांनी संगितले.
डोंबिवलीतल्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानदाराने सांगितले की, ६० टक्के विक्री मोबाईल फोनची होत असून एलईडीला ३० टक्के मागणी आहे. १० टक्के मागणी इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना आहे.
मोबाईल व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्यानंतर ज्वेलरी व डिझायनर साड्या यांना पसंती असल्याचेही दिसून आले. त्याचबरोबर बंधूराज आणि पतीराजांकडून सोन्याच्या दागिन्यांबरोबरच वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरीला जास्त प्रमाणात मागणी असल्याचे एका दुकानदाराने सांगितले. हे वन ग्रॅम गोल्डचे दागिने ५०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सध्या सर्वत्र चेन स्रॅचिंग होत असल्याने तसेच तत्सम घटना घडत असल्याने सोन्याच्या दागिन्यांपेक्षा तत्सम दिसणाऱ्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. अनेक युवती, स्त्रिया दररोज रेल्वेने प्रवास करतात. दुचाकीवरून जा-ये करतात अशावेळी सुरक्षितता म्हणून शुद्ध सोन्याची चेन अथवा कानातले घालण्यापेक्षा एक ग्रॅम सोन्याचे दागिने घालण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळेच भाऊबीजेला या दागिन्यांना मागणी आहे.
आर्टीफिशअल इअरींग्जचा ट्रेंड खूप जोरात आहे. झुमके, बांगड्या आदी गोष्टींनाही मागणी आहे. ते १५० ते २०० रुपयाला मॉल्समध्ये उपलब्ध आहेत.
बहीण किंवा पत्नीसाठी साडी अथवा ड्रेस ही खरेदी तर ठरलेली असतेच मात्र ती दिवाळीची आणि ओवाळणी म्हणून काहीतरी वेगळी वस्तू देण्याचा नवा ट्रेण्ड सध्या सुरु झाला आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ तेजीत आली आहे. मायक्रोवेव्ह पासून ते इंडक्शन प्लेटस् आणि त्याची भांडी यांचीही बाजारपेठ सध्या अत्यंत जोरात आहे.