पाेलिसांना ५३ बालकांचा शोध घेण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:06+5:302021-07-11T04:27:06+5:30
मीरारोड : ‘ऑपरेशन मुस्कान-१०’अंतर्गत मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ५३ बालकांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. लहान मुलांची शोधमोहीम १ ...
मीरारोड : ‘ऑपरेशन मुस्कान-१०’अंतर्गत मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ५३ बालकांचा शोध पोलिसांनी घेतला आहे. लहान मुलांची शोधमोहीम १ ते ३० जून या कालावधीत राबविण्यात आली होती.
पोलीस आयुक्त सदानंद दाते, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा भाईंदर व नालासोपारा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. हरवलेल्या किंवा पळवून नेलेल्या १८ वर्षांखालील बालकांचा शोध घेऊन ही मोहीम राबविली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष मीरा-भाईंदर, नालासोपारा व पोलीस ठाणेनिहाय एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस अमलदार यांचे पथक तयार केले होते. या मोहिमेत १८ वर्षांखालील १६ मुले व ३७ मुली असे एकूण ५३ बालकांना ताब्यात घेऊन चौकशी करून सर्व बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात पोलीस ठाणे अभिलेखावरील ४३, तर १० बेवारस बालकांचा समावेश आहे. तसेच २९४ हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यात आला.