कसारा येथे सहा घरांवर पडली दरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:47+5:302021-07-23T04:24:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसारा : शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सहा घरांवर बुधवारी मध्यरात्री डोंगरातील माती व दरडीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसारा : शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सहा घरांवर बुधवारी मध्यरात्री डोंगरातील माती व दरडीचा मलबा कोसळला. मात्र, वेळीच सहा घरांतील सर्वजण बाहेर पळाल्याने बचावले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या घटनेमुळे कसारा गावाची वाटचाल माळीणकडे होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहापूर तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी मध्यरात्री पंचशीलनगर, आनंदनगर, देऊळवाडी, निगडवाडी, शिवाजीनगर, तानाजीनगर परिसरातील घरांवर दरडी व मातीचा मलबा कोसळला. त्यात सहा घरे दडपल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, घरातील सर्व मंडळी बाहेर पळाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील गॅस, अन्नधान्य, शालेय साहित्य तसेच महत्त्वाच्या वस्तूंची नासधूस झाली आहे.
आनंदनगर, पंचशीलनगर, देऊळवाडी, निंगडवाडी, ठाकूरवाडी, कोळीपाडा, तानाजीनगर येथे डोंगर पोखरून नव्याने वाड्या, वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी डोंगर व टेकड्या कमकुवत झाल्याने भविष्यात अतिवृष्टीमुळे कसाऱ्याचे माळीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी वनजमिनीवर उभ्या राहिलेली धोकादायक घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावणार असल्याचे माहिती दिली.
----------------------