मीरा-भार्इंदर पालिका मुख्यालयात रंगले केबिन वॉर
By Admin | Published: January 18, 2016 01:48 AM2016-01-18T01:48:20+5:302016-01-18T01:48:20+5:30
विभागाचा खांदेपालट होऊनदेखील मीरा-भार्इंदर मुख्यालयातील अधिकारी आपली दालने सोडण्यास तयार नसल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेत सध्या केबिन वॉर रंगले आहे.
मीरा रोड : विभागाचा खांदेपालट होऊनदेखील मीरा-भार्इंदर मुख्यालयातील अधिकारी आपली दालने सोडण्यास तयार नसल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेत सध्या केबिन वॉर रंगले आहे.
सहायक आयुक्त म्हणून प्रतिनियुक्तीने आलेल्या कल्पिता पिंपळे यांच्याकडे सुरुवातीला कर, तर स्वाती देशपांडे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग दिला होता. कर संकलक यांच्यासाठीचे पहिल्या मजल्यावरील दालन मिळालेल्या पिंपळे यांनी त्याचे नूतनीकरण करून अॅण्टी चेंबर व स्वच्छतागृह बांधून घेतले. तिसऱ्या मजल्यावरील सामान्य प्रशासनाचे दालन मिळालेल्या देशपांडे यांनीदेखील दालन सुशोभित करून अॅण्टी चेंबर बनवले.
मध्यंतरी पिंपळे यांच्याकडून कर विभाग काढून घेऊन तो देशपांडे यांना देण्यात आला. तर, सामान्य प्रशासनासह पिंपळे यांच्याकडे परिवहनची जबाबदारी देण्यात आली. परंतु, त्यांनी आपले पहिल्या मजल्यावरील कर विभागाचे दालन काही सोडलेच नाही. त्यामुळे कर विभाग पहिल्या मजल्यावर असताना कर्मचारी व अधिकाऱ्यांना मात्र तिसऱ्या मजल्याचे जिने झिजवावे लागत आहेत.
तीच गत सामान्य प्रशासनाशी संबंधित कर्मचारी अधिकारी यांची होत आहे. आता तर पिंपळे यांच्याकडून सामान्य प्रशासन काढून घेऊन परिवहनसह ग्रंथालय व शिक्षण विभाग दिले आहेत. हे तिन्ही विभाग नगर भवनमध्ये असून तेथे जागा उपलब्ध असताना त्या अद्यापही दालन सोडण्यास तयार नाहीत. देशपांडे यांच्याकडे कर विभागासोबत आता परवाना व बाजार लिलावाचे कामकाज सोपवले आहे. तरीही त्या सामान्य प्रशासनाचे दालन सोडत नाहीत.
परिणामी, सामान्य प्रशासनाचा पदभार सोपवलेले गोविंद परब हे नगरसचिव विभागाच्या दालनात बसत आहेत. तर, आमचे दालन रिकामे करा म्हणून सचिव कार्यालयाने परब यांच्यामागे तगादा लावला आहे.