जुन्या अंबरनाथ गावात निघाली पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:31 AM2021-04-29T04:31:58+5:302021-04-29T04:31:58+5:30
अंबरनाथ : राज्य सरकारने एकीकडे ब्रेक द चेन अंतर्गत राज्यभरात कडक लॉकडाऊन जारी केलेला असताना अंबरनाथमधील जुन्या अंबरनाथ गावात ...
अंबरनाथ : राज्य सरकारने एकीकडे ब्रेक द चेन अंतर्गत राज्यभरात कडक लॉकडाऊन जारी केलेला असताना अंबरनाथमधील जुन्या अंबरनाथ गावात मात्र हनुमान जयंतीनिमित्त शेकडोंच्या उपस्थितीत पालखी काढण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
अंबरनाथ शहराला लागूनच असलेल्या जुन्या अंबरनाथ गाव परिसरात दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त पालखी काढली जाते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यभरात लॉकडाऊन लागू झाला असून गर्दी करणारे कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र असे असतानाही जुन्या अंबरनाथ गावात मंगळवारी संध्याकाळी हनुमान जयंतीनिमित्त पालखी काढण्यात आली. या पालखीमध्ये गुलालाची उधळण करत बेंजोच्या तालावर मोठ्या संख्येने सहभागी होऊन नाचताना दिसले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल झाला. गावातील काही तरुणांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियाच्या स्टेटसवर ठेवल्यामुळे या प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागला. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या व्हिडीओची पुष्टी करत ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली.