पालघर जिल्ह्यात एसटीचे वाजले बारा

By admin | Published: September 26, 2016 02:02 AM2016-09-26T02:02:03+5:302016-09-26T02:02:03+5:30

वसई तालुक्यातील शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करीत चाललेल्या एसटी महामंडळाने पालघर जिल्हातील विविध डेपोतून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या तब्बल ५४ बस सेवा बंद केल्या आहेत

In the Palghar district, ST is at 12 o'clock | पालघर जिल्ह्यात एसटीचे वाजले बारा

पालघर जिल्ह्यात एसटीचे वाजले बारा

Next

शशी करपे,  वसई
वसई तालुक्यातील शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करीत चाललेल्या एसटी महामंडळाने पालघर जिल्हातील विविध डेपोतून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या तब्बल ५४ बस सेवा बंद केल्या आहेत. एकीकडे प्रचंड तोट्यात चाललेल्या पालघर विभागाचा कार्यभार सध्या एका इंजिनिरच्या हाती सोपवण्यात आला आहे. तर अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक, चालक यांच्यासह तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मिळून ६५३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एसटी दिवसेंदिवस पोरकी होत चालली आहे.
वसई आणि नालासोपारा डेपोतून सुटणाऱ्या २५ मार्गावरील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. मात्र, लोकांचा वाढता विरोध आणि वसई विरार पालिकेच्या परिवहन ठेकेदाराकडे बसेसचा असलेला तुटवडा यामुळे तूर्तास या मार्गावरील बससेवा सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र, एसटीने तोट्याचे कारण पुढे करीत वसई तालुक्यातील अर्नाळा, नालासोपारा आणि वसई डेपोतून सुटणाऱ्या ५५ मार्गांवरील शहरी बस वाहतूक टप्याटप्याने बंद केली आहे. २०१३ साली वसई डेपातून २९, अर्नाळा डेपोतून २१ आणि नालासोपारा डेपोतून ३० मिळून एकूण ८० मार्गावर शहरी बससेवा सुरु होती. मात्र, मार्च २०१३ पासून एसटीने टप्याटप्याने शहरी बस सेवा बंद करण्यास सुरुवात केली आहे. सध्या वसई डेपोतून ९ आणि नालासोपारा डेपोतून १६ मिळून एकूण २५ मार्गांवरच्या बस सेवा सुरु आहे. ती ही आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर पालघर विभागातील डेपोतून दररोज २१ हजार ८२१ किलोमीटर धावणाऱ्या ५४ मार्गांवरील लांब पल्ल्यांच्या बससेवा बंद करण्यात आल आहेत. थेट प्रवासी मिळत नसल्याचे कारण दाखवून एसटीने लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद केल आहेत. प्रत्यक्षात या गाड्या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या होत्या. ५४ बस बंद केल्याने दररोज किमान १० ते १२ लाखांचे नुकसान होते आहे. खाजगी वाहतूकदारांच्या फायद्यासाठीच लांब पल्ल्यांच गाड्या राज्यभर बंद करण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे, खाजगी गाड्यांना टप्पा वाहतूक करण्यास मनाई असतानाही त्या राजरोसपणे टप्पा वाहतूक करीत असल्याने एसटीला दुहेरी फटका सहन करावा लागत आहे, असा आरोप एसटी कामगार संघटनेचे पालघर विभागीय अध्यक्ष भरत पेंढारी यांनी केला आहे.
विभाग नियंत्रक दिलीप मोरे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा कार्यभार मेकॅनिकल इंजिनिअरकडे देण्यात आला आहे. विभागाच्या कार्यशाळेतील सहाय्यक मेकॅनिकल इंजिनिअरचे पद रिक्त आहे. विभागात पाच महिने झाले पूर्णवेळ वाहतूक अधिकारी नाही. मुख्यालयात तीन महिन्यांपासून अधिक्षकाचे पद रिक्त आहे. साडेतीन हजार कामगार असलेल्या विभागाला अद्याप स्वतंत्र कामगार अधिकारी नेमलेला नाही. जिल्ह्यात वसई, नालासोपारा,अर्नाळा, सफाळे, पालघर, बोईसर, डहाणू आणि जव्हार असे आठ डेपो आहेत. मात्र, जव्हार, सफाळे आणि बोईसर डेपोला स्वतंत्र मॅनेजर नाही. प्रत्येक डेपोत कार्यालयीन कर्मचारी, वाहक, चालक, तांत्रिक कर्मचाऱ्यांची कित्येक पदे रिक्त आहेत.

Web Title: In the Palghar district, ST is at 12 o'clock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.