पालघरमध्ये भाजपाची कोंडी; शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसकडे मदतीसाठी विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 12:26 PM2018-05-10T12:26:56+5:302018-05-10T12:49:25+5:30
शिवसेनेनं दुर्लक्ष केल्यानं पालघरमध्ये भाजपानं काँग्रेसकडे मदतीची विनंती केली आहे
पालघर: भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपाची कोंडी झालीय. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं अडचणीत सापडलेल्या भाजपानं आता काँग्रेसकडे पाठिंबा मागितलाय. पालघरमध्ये पाठिंबा द्या आणि पलूसमध्ये पाठिंबा घ्या, अशी ऑफर भाजपाकडून काँग्रेसला देण्यात आलीय. याआधी भाजपानं पालघरमधील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेलाही गळ घातली होती. वनगा कुटुंबीयांना भाजपमध्ये पाठवा, आम्ही त्यांचं पुनर्वसन करू, असा प्रस्ताव भाजपनं शिवसेनेला दिला होता.
श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपानं काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांना पक्षात प्रवेश देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र गावित यांनी अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. या ठिकाणी भाजपाची विचित्र कोंडी झालीय. त्यामुळे शिवसेनेनं वनगा कुटुंबियांना भाजपामध्ये पाठवावं, त्यांना भाजपाकडून विधानपरिषदेत संधी दिली जाईल, असा प्रस्ताव भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आला. मात्र अद्याप शिवसेनेनं या प्रस्तावाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
शिवसेनेनं पालघरमध्ये कुरघोडी केल्यानं आता भाजपानं काँग्रेसला मदतीची विनंती केलीय. पालघरमध्ये पाठिंबा द्या आणि पलूस विधानसभा पोटनिवडणुकीत मदत मिळवा, असा प्रस्ताव भाजपाकडून काँग्रेसला देण्यात आलाय. काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या मृत्यूमुळे पलूसमध्ये पोटनिवडणूक होतेय. याठिकाणी काँग्रेसनं पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी दिलीय. पलूसमधील निवडणूक बिनविरोध व्हावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपाचा प्रस्ताव काँग्रेस स्वीकारणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, भाजपचे राजेंद्र गावित आणि काँग्रेसचे दामोदार शिंगडा अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.