भाजपाचा शिवसेना, काँग्रेसला काटशह; पालघर पोटनिवडणुकीत केली चलाख खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 10:39 AM2018-05-08T10:39:33+5:302018-05-08T10:57:19+5:30
शिवसेनेच्या फोडाफोडीला भाजपा उत्तर देण्याच्या तयारीत
मुंबई: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राजेंद्र गावित यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना पालघरमधून उमेदवारी देण्याची भाजपची रणनिती आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी स्थानिक पदाधिकारी आणि आमदारांची बैठक झाल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिलीय. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे.
भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबानं गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर भाजपाकडून वनगा कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांच्या पत्नी जयश्री यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. याशिवाय चिंतामण वनगा यांचा मोठा मुलगा श्रीनिवास लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होता. त्यामुळेच शिवसेनेनं वनगा कुटुंबाला पक्षात घेत भाजपाला शह दिला. यानंतर आता भाजपानं शिवसेनेसोबतच काँग्रेसवर कुरघोडी करण्याची तयारी सुरू केलीय. काँग्रेस नेते आणि माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. यासाठी संध्याकाळपर्यंत त्यांना भाजपात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राजेंद्र गावित पालघर लोकसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र काँग्रेसकडून त्यांच्याऐवजी दामोदार शिंगडा यांना पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. शिंगडा यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु असल्यानं गावित आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत. याच नाराजीचा फायदा उचलून काँग्रेस आणि शिवसेनेला एकाचवेळी धक्का देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपानं गावित यांनी तशी गळदेखील घातलीय. गावित यांना पक्षात आणण्यासाठी भाजपाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.