पालघर : शिवसेनेचे १८ ग्रामपंचायतींवर वर्चस्व
By admin | Published: May 30, 2017 05:11 AM2017-05-30T05:11:23+5:302017-05-30T05:11:23+5:30
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्यात सेनेला यश आले आहे. ४ ग्रा.पं. बविआ, १ भाजप, १ ग्रामविकास
हितेन नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्यात सेनेला यश आले आहे. ४ ग्रा.पं. बविआ, १ भाजप, १ ग्रामविकास समितीकडे तर २ मध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज सकाळी १० वाजता आर्यन शाळेमध्ये मतमोजणी झाली. निकाल घोषित होऊ लागल्या नंतर भगवे झेंडे आणि कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला च्या जयघोषात पूर्ण परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला होता. त्यामुळे पालघर तालुका हा सेनेचा बालेकिल्ला असल्याचे आज ह्या निकालाने सिद्ध केले.
उमरोळी, पंचाळी, नवापूर, मुरबे, केळवे, ह्या ग्रामपंचायतींच्या निकालावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. बहुजन विकास आघाडीची सत्ता असलेल्या ह्या ग्रामपंचायती सेनेने आपल्याकडे खेचून आणल्या असून फक्त मुरबे ग्रामपंचायतीमध्ये ७-७ अशा समसमान जागा निवडून आल्याने सत्तेची चावी स्वाभिमान संघटनेच्या एकमेव विजयी उमेदवारांकडे असल्याचा दावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोशन पाटील यांनी केला असला तरी सर्वपक्षीय आघाडीने ठरविल्याने सरपंच आमचाच असेल असे सेनेचे जि प उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी सांगितले. उमरोळी येथील बहुजन विकास आघाडीच्या प्रभाकर पाटलांची सत्ता उलथून टाकीत सेनेने आपला झेंडा रोवला .तर केळवे येथील बविआ च्या सरपंचा विरोधातील संतप्त भावना मतदारांनी मतपेटीतून व्यक्त करतांना बविअच्या अनेक उमेदवाराना पराभूत केले. तेथे सेनेचे १४ उमेदवार विजयी झाले तर मनसे १ तर बहुजनला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले. नवापूर येथे बहुजन आणि सेनेच्या असलेल्या सत्तेलाही सुरुंग लावून भाजपचे अशोक वडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अंकुर राऊत यांच्या नेतृत्वा खाली १३ पैकी ७ जागांवर बहुमत मिळविले. तारापूर एमआयडीसी प्रदूषणाच्या पाईपलाईन प्रकरणात काही ग्रामपंचायत सदस्याचा असलेला छुपा पाठिंबा आणि विकासकामांच्या नावावर चाललेली अनियमितता यामुळे सेनेचा पुरता धुव्वा उडवितांना मतदारांनी बहुजनलाही सत्तेपासून रोखले. खारे कुरण ग्रामपंचायतीमध्ये हि सेनेचे सभापती रवींद्र पागधरे ह्यांना धक्का देऊन मिठागरांच्या मुद्यावर बविआ ने शिटी वाजवून सत्ता प्रस्थापित केली. तालुक्यातील २६ ग्रामपंचायती पैकी फक्त मोरेकुरण, ह्या एकमेव ग्रामपंचायती वर सेनेची सत्ता होती, तर उर्वरीत पंचाळी, उमरोळी, आलेवाडी, मुरबे, नवापूर, केळवे, मांडे, नांदगाव, कान्द्रेभुरे, दातीवरे, वेढी, कुंभवली, दापोली, मोरेकुरण, कोलवडे, दांडे खटाळी, विराथन, माकुणसार, खारेकुरण, ई. ग्रामपंचायतींवर बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षाची सत्ता होती.त्यांच्या कडून सत्ता हिरावून घेण्यात आपण बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने यशस्वी झालो. अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे यांनी व्यक्त केली आहे. उपजिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, वैभव संखे, सुधीर तामोरे, संजय तामोरे, अनुप पाटील व युवसेनेची टीम तसेच शिवसैनिकांनी दिलेल्या साथीमुळेच तालुक्यात सेनेला हा विजय मिळवता आला. पालघर तालुक्यात सेनेचे असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्यात सेनेला यश आले असेही ते म्हणाले.