पालघर : नववी प्रवेशाची समस्या सुटली

By admin | Published: June 23, 2017 05:10 AM2017-06-23T05:10:31+5:302017-06-23T05:10:31+5:30

तलासरी तालुक्यातील ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर झाल्याचे वृत्त लोकमतने देताच मंगळवारी जिल्हा

Palghar: The problem of entry of the ninth was solved | पालघर : नववी प्रवेशाची समस्या सुटली

पालघर : नववी प्रवेशाची समस्या सुटली

Next

हितेन नाईक/निखिल मेस्त्री।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/नंडोरे : तलासरी तालुक्यातील ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न गंभीर झाल्याचे वृत्त लोकमतने देताच मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली असता जिल्ह्यातील शाळांमध्ये ८ वी च्या वर्गाना जोडून ९ वी व १० वी चे वर्ग नव्याने सुरु करण्याबाबतचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश त्यांनी दिले.
जिल्ह्यात ९ वी च्या प्रवेशाची गंभीर समस्या गेल्या १-२ वर्षांपासून भेडसावत असून यावर्षीही शिक्षण विभागाने यासंदर्भात काही ठोस उपाययोजना न आखल्याने त्याची पुनरावृत्ती होऊन जिल्ह्यातील सुमारे ३ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार होते. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार पास्कल धनारे, जि. प.अध्यक्ष सुरेख थेतले,उपाध्यक्ष व शिक्षण सभापती सचिन पाटील यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची दालनात भेट घेऊन यासंदर्भात सकारात्मक चर्चा केली.
जिल्ह्यात ८ वी चे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या ४२९ शाळा असून या शाळांमधून ८ वीत उत्तीर्ण होऊन ९ वीत गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४३ हजार ४५४ इतकी आहे. याव्यतिरिक्त आश्रमशाळांमधून ७ हजार २६६ विद्यार्थी ९ वी च्या वर्गात गेले आहेत. सर्व शाळांच्या क्षमता विचारात घेता जिल्ह्यात ९ वीतील अतिरिक्त विद्यार्थी संख्या १४ हजार पर्यंत पोचत होती. मात्र दरम्यानच्या काळात अनेक शाळांनी यातील निम्याहून अधिक शाळांना सामावून घेतले असल्याचे सांगितले जाते. या विद्यार्थ्यांना सामावून घेतल्यानंतरही सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न कायम होता. सरकार सध्याच्याच अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देत नसल्याने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी अतिरिक्त ठरणाऱ्या या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास असमर्थता दाखविली होती. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंबंधात आमदार पास्कल धनारे यांच्याशी चर्चा केली. नंतर जि. प.चे शिष्टमंडळ त्यांना व पालकमंत्र्यांना घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटले. जिल्ह्यातील ९ वी च्या प्रवेशाची स्थिती त्यांच्यासमोर मांडली. जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेल्या ८ वीच्या शाळांना ९ वी व १० वी चे वर्ग नव्याने सुरु करता येतील का? याबाबतीत चाचपणी करण्याचा निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ९ वी १० वी चे वर्ग सुरु करता येऊ शकतील अशा शाळा पाहून तिथे नववीचे नवे वर्ग सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जि. प. चे शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश कंकाळ यांना दिले.
जिल्ह्यात ९ वी तील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न तलासरी तालुक्यात सर्वात गंभीर असून या तालुक्यातील सुमारे १ हजार ३०० विद्यार्थी प्रवेशापासून आजही वंचित आहेत. अन्य तालुक्यात प्रवेशापासून वंचित असलेल्यांची संख्या सरासरी ३०० ते ४०० असल्याचे समजते. शिक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत असा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी दिली. ९ वीच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून तो शिक्षणमंत्र्यांना सादर करण्यासाठी गुरुवारी शिक्षणाधिकारी मंत्रालयात गेले होते. यामुळे नववीच्या प्रवेशाची समस्या तातडीने सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तलासरीतील नववी प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागणार
तलासरी : या तालुक्यातील विद्यार्थ्यांची नववी प्रवेशासाठी वणवण सुरु आहे. या बाबतचे वृत्त दैनिक लोकमतच्या १८ जून च्या अंकात ‘नववी प्रवेशा पासून १६८२ वंचित, तावडेजी सांगा कधी आणि कुठे देणार यांना प्रवेश? या मथळ्या खाली वृत्त प्रसिद्ध होताच आमदार पास्कल धनारे यांनी याची दाखल घेऊन मंगळवारी दुपारी मंत्रालयात पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या दालनात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समोर मांडताच दोन-तीन दिवसात यावर तोडगा काढण्याचे ठरले आहे. यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली असून नववीच्या प्रवाशाप्रश्न तातडीने सोडवण्यात येणार आहे. यावेळी तलासरी पंचायत समितीचे सभापती वनशा दुमाडा, उपसभापती भानुदास भोये, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा थेतले, उपाध्यक्ष सचिन पाटील, डहाणूच्या सभापती चंद्रिका अंबात, तलासरी पंचायत समितीचे सदस्य सुनील निकुंभ, उर्मिला शिंगडे, संगीता ओझरे, जि. प.सदस्या गीता धामोडे हे उपस्थित होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थिताशीं चर्चा केली. यावेळी सवरा यांनीही तुकड्या मान्यतेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगितले. तलासरी दौऱ्याच्या वेळीही शिक्षण मंत्र्यांना तुकड्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे हाल निदर्शनास आणून देण्यात आले होते. पालकमंत्र्यांच्या दालनात झालेल्या चर्चेमध्ये तुकड्या मान्यतेसाठी समिती स्थापन करण्यात येऊन दोन- तीन दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल यात प्राधान्याने जिल्हा परिषद शाळांच्या नव्या तुकड्यांच्या प्रस्तावावर प्रथम विचार करण्यात येईल असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Palghar: The problem of entry of the ninth was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.