पालघरच्या शिक्षकांना घरवापसीची दारे झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:51 AM2021-06-16T04:51:49+5:302021-06-16T04:51:49+5:30
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेकडून पालघर जिल्ह्यातील विकल्प विपरीत शिक्षकांना बिंदुनामावलीनुसार टप्प्याटप्प्याने सामावून घेतले जाणार आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात ...
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेकडून पालघर जिल्ह्यातील विकल्प विपरीत शिक्षकांना बिंदुनामावलीनुसार टप्प्याटप्प्याने सामावून घेतले जाणार आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात अ. ज, इ. मा.व, खुल्या संवर्गातील एक हजार ३९९ शिक्षक अतिरिक्त बिंदूवर काम करत आहेत. यात पालघर जिल्ह्यात कार्यरत विकल्प विपरित शिक्षकांना आता ठाणे जिल्ह्यात परतीचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. कारण परतीसाठी सेवाज्येष्ठता हा निकष डावलून ठाणे जिल्हा परिषदेने अवलंबिलेल्या चुकीच्या कार्यवाहीविरुद्ध आंदोलनाचा इशारा विकल्प विपरित संघर्ष समितीने कोकण आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
२०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर नवनिर्मित पालघर जिल्ह्यात कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी २०१८ मध्ये ठाणे जिल्ह्यातील ३७० शिक्षकांना त्यांनी दिलेल्या विकल्पाच्या विरोधात तात्पुरत्या स्वरूपात पालघर जिल्ह्यात समायोजित केले होते. ते करताना शिक्षकांची सेवाज्येष्ठता ठाणे जिल्ह्यात कायम ठेवली आहे; मात्र ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सेवाज्येष्ठता यादीत पालघरमधील कार्यरत या शिक्षकांचाही समावेश केलेला आहे. पालघर जिल्ह्यात १६६ शिक्षकांची नव्याने भरती झाल्याने ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आपल्याकडील रिक्त असलेल्या ५७ पदानुसार शिक्षकांची पालघर जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे. ठाणे जिल्हा परिषदेत एससी, ओबीसी, खुल्या संवर्गातील एक हजार ३९९ शिक्षक अतिरिक्त बिंदूवर काम करत असल्याने फक्त एसटी,व भ.ज-ड संवर्गातीलच शिक्षकांची मागणी पालघर जिल्हा परिषदेकडे केल्याने एस टी. वगळता इतर सर्व संवर्गातील पालघर जिल्ह्यात कार्यरत विकल्प विपरित शिक्षकांना ठाण्यात परतीची दारे बंद झाली असून सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना आता पालघरमध्येच थांबावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेची चुकीची कार्यवाही
२९ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार विकल्प प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंतरजिल्हा बदली किंवा नव्याने भरती प्रक्रियेस बंदी असताना ठाणे जिल्हा परिषदेने २७ आंतर जिल्हा बदली शिक्षकांना हजर करून घेतले. विकल्प विपरितांचे सेवाज्येष्ठतेनुसार समायोजन न करता बिंदुनामावलीनुसार आग्रह धरला आहे.
......
"आपल्याच आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना बिंदू शिल्लक नसल्याचे कारण दाखवून लटकावून ठेवायचे. परंतु, शासन निर्णयात बंदी असतानाही बिंदू शिल्लक नसताना आंतर जिल्हा बदली शिक्षकांना हजर करून घेतले. प्राथमिक शिक्षण विभागाने आपली आडमुठी भूमिका न सोडल्यास आंदोलनाबरोबरच उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करू.
धनंजय धानके - अध्यक्ष -विकल्प विपरित संघर्ष समिती ठाणे -पालघर.