‘सेना-भाजपामुळे पालघरचा विकास मृत्युपंथाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:12 AM2018-05-22T01:12:07+5:302018-05-22T01:12:07+5:30
राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय रूप आहे.
पालघर : चार वर्षांत विकासाची कोणतीही कामे केली नाहीत त्यामुळेच मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजपा आणि शिवसेनेवर आली आहे. एकीकडे पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधाऱ्यांमुळे मरणासन्न अवस्थेत असून दुसरीकडे भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर बडवून मतांचा जोगवा मागत आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, समृद्धी महामार्ग व नाणारच्या शेतकºयांना फसवल्यानंतर आता यांचा डोळा इथल्या लोकांच्या जमिनीवर आहे. ही निवडणूक साधू विरुद्ध संधीसाधू, निष्ठावंत विरुद्ध गद्दार, नीती विरुद्ध अनीती आणि सत्य विरुद्ध असत्य अशी आहे. पालघरवासीय भाजपा, शिवसेना व बहुजन विकास आघाडी या तिन्ही सत्ताधाºयांचा आणि दलबदलूंचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही आणि जनसेवेचे व्रत घेतलेल्या दामू शिंगडा यांना विजयी करतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पेण या ठिकाणी वाँटेड आहेत. कल्याण-डोंबिवलीकर आमचे साडेसहा हजार कोटी कुठे गेले? आणि पेणवासीय पेण अर्बन बँकेकडे तारण असलेल्या जमिनी सिडको कधी विकत घेणार, याकरिता मुख्यमंत्र्यांचा शोध घेत असल्याचे सावंत म्हणाले.
मुख्यमंत्री निरव मोदी व विजय मल्ल्याचे राजकीय अवतार
राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका करताना सावंत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री हे निरव मोदी, विजय मल्ल्या यांचे राजकीय रूप आहे. मोदी, मल्ल्या या मंडळींनी ज्याप्रमाणे आमिषे दाखवून बँकांचे पैसे लुबाडून पोबारा केला, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री निवडणूक आली की आश्वासनांची खैरात करून सर्वसामान्यांची मते लुबाडून त्यांची फसवणूक करून पोबारा करतात.