पालघरच्या श्री राम संघाने मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाचा ३२-३०ने केला पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 01:25 PM2023-04-19T13:25:48+5:302023-04-19T13:25:48+5:30
महिला गटातील दुसऱ्या सामन्यात वसईच्या ऋषी वाल्मिकी महिला संघाने मुंबई शहरच्या अमर हिंद महिला मंडळ संघाचा ३३-३१ असा २ गुणांनी पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
- विशाल हळदे
ठाणे- श्री मावळी मंडळ आयोजित ९८ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७० व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरुष गटात श्री राम कबड्डी संघ पालघर, शुर संभाजी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, जय भवानी तरुण मंडळ मुंबई उपनगर, जय हनुमान स्पोर्ट्स क्लब ठाणे या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर, नवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, ऋषी वाल्मिकी महिला संघ वसई, श्री राम पालघर या संघानी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महिला गटाच्या अतिशय अटीतटीच्या सामन्यात पालघरच्या श्री राम संघाने मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाचा ३२-३०असा २ गुणांनी पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यांतराला स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाने १९-१०अशी ९ गुणांची भक्कम आघाडी घेतली ती यशिका पुजारीच्या उत्कुष्ट लढायांमुळे व तिला नेहा पांडव हिने पक्कडीत सुंदर साथ दिली. परंतु मध्यन्तरानंतर श्री राम संघाच्या ऐश्वर्या धवन हिने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. तिला श्रुती सोमासेने पक्कडीत चांगली साथ दिली व आपल्या संघाचा विजय खेचून आणला.
महिला गटातील दुसऱ्या सामन्यात वसईच्या ऋषी वाल्मिकी महिला संघाने मुंबई शहरच्या अमर हिंद महिला मंडळ संघाचा ३३-३१ असा २ गुणांनी पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यन्तराला ऋषी वाल्मिकी महिला संघाकडे १३-११ अशी २ गुणांची नाममात्र आघाडी होती. परंतु मध्यन्तरानंतरही हर्षा व दिव्या रेडकर यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची २ गुणांची आघाडी शेवटपर्यंत राखली. पराभूत संघाकडून श्रद्धा कदम एकाकी लढली.
पुरुष गटातील पहिल्या सामन्यात मुंबई उपनगरच्या वीर परशूराम कबड्डी संघाने उल्हासनगरच्या श्री साई क्रीडा मंडळ संघाचा ३१-२७ असा ४ गुणांनी पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यन्तराला वीर परशूराम कबड्डी संघाने १५-०९ अशी ६ गुणांची घेतली ती आदर्श चौरासियाच्या ४खोलवर चढाया व आदेश सावंतच्या बहारदार पक्कडीमुळे. उत्तरार्धात श्री साई क्रीडा मंडळ संघाच्या संदीप यादव याने अष्टपैलू खेळ करीत आपल्या संघासाठी गुण मिळवले. परंतु तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही.
पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या विजय स्पोर्ट्स काल्हेर संघाने मुंबई उपनगरच्या मुलुंड क्रीडा केंद्र संघाचा अतिशय रोमहर्षक सामन्यात ३८-३२ असा ६ गुणांनी पराभव केला. सदर सामन्यात मध्यन्तराला विजय स्पोर्ट्स काल्हेर संघाकडे १७-१६ अशी नाममात्र १ गुणांची आघाडी होती. सामना हा अनेक वेळा समसमान गुणांवरच होता. सामना संपायला शेवटची दोन मिनिटे शिल्लक असतानासुद्धा हा सामना ३१-३१ अशा समसमान गुणांवरच होता. परंतु विजय स्पोर्ट्स काल्हेर संघाच्या अक्षय पाटीलने एकाच चढाईत ३ गुण मिळवत आपल्या संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. पराभूत संघाकडून योगेश गौरव एकाकी लढला.