पालघरचे आठवडाबाजार सात महिन्यांनी आले रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:14 AM2020-11-09T00:14:46+5:302020-11-09T00:14:54+5:30
पालघर : कोरोना महामारीच्या काळात मागील ७ महिन्यांपासून बंद असलेले पालघर जिल्ह्यातील आठवडा बाजार ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. नोकऱ्या ...
पालघर : कोरोना महामारीच्या काळात मागील ७ महिन्यांपासून बंद असलेले पालघर जिल्ह्यातील आठवडा बाजार ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. नोकऱ्या गमावून बसलेल्या आणि व्यवसायही ठप्प पडल्याच्या अवस्थेत सध्या हे आठवडा बाजार पुन्हा रुळावर येऊ लागले आहेत.
जिल्ह्यात पालघर, विक्रमगड, तलासरी, वाडा, वसई आदी तालुक्यातील अनेक गावांत आठवडा बाजारात लाखो रुपयांची उलाढाल हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाला मदत करणारी ठरणारी होती. कपडे, मासे, मसाले, शोभिवंत वस्तू आदी साहित्याच्या विक्रीची मोठी उलाढाल या बाजारपेठेतून होत होती. परंतु मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न पुढे येऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने १४ ऑक्टोबरपासून हे आठवडा बाजार काही शर्ती अटीवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु हाताला काम नाही आणि व्यवसाय नसल्याने प्रथम आठवडा बाजारात गर्दीच दिसत नव्हती.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात शासकीय कर्मचारी व औद्योगिक वसाहतीमधील जवळपास ५० टक्के कारखाने ३५ ते ४० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झाले. या सर्वांचे पगार व दिवाळी बोनस आणि ॲडव्हान्समुळे पालघर जिल्ह्याच्या ठिकाणच्या बाजारात खरेदीसाठी लाख-दीड लाख लोक सकाळी आठ वाजल्यापासून आल्याने साथ आठ महिन्यांनंतर प्रथमच प्रचंड गर्दी झाली होती. केवळ आठवडा बाजारात साधारण तीन ते चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर पुढील बाजार १३ नोव्हेंबर रोजी असल्याने त्या वेळी औधोगिक क्षेत्रातील कामगारांचा पगार झालेला असेल. त्यामुळे याहीपेक्षा बाजारात अधिक गर्दी उसळण्याची शक्यता आहे.