कोकणातील पालखी नृत्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा 

By अजित मांडके | Published: March 20, 2023 11:34 AM2023-03-20T11:34:28+5:302023-03-20T11:35:30+5:30

कळवा येथील खारलँड मैदानावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

palkhi dance from konkan will take it to international level announcement by jitendra awhad | कोकणातील पालखी नृत्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा 

कोकणातील पालखी नृत्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दहीहंडीचा सण आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला. अन् गल्लीत बालगोपाळांपुरता मर्यादीत असलेला हा सण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला. आता कोकणातील पालखी नृत्य आपण ठाण्यात साजरा करीत आहोत. आता हा सण आणि ही पालखी नृत्याची  संस्कृती आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊ, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

कळवा येथील खारलँड मैदानावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शिमगोत्सवात जितेंद्र आव्हाड यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नृत्य केले. या प्रसंगी आव्हाड बोलत होते. 

 म्हणाले की, कोकणी माणूस हा संस्कृती आणि गाव प्रिय असणारा माणूस आहे. आज जी मुंबई आपणाला दिसत आहे. या मुंबईला घडविण्यात कोकणी माणसाचा मोठा वाटा आहे. येथील मिलमध्ये कोकणी माणूसच आधी नोकरीला लागला. कोकणी माणूस शिमगा आणि गणपतीला जसा न चुकता गावी जातो. तसाच तो आपल्या जीवनात आणि व्यवहारातही काटेकोर आहे. कोकणी माणूस कधीच वीजबिल बुडवत नाही. कोकणी माणूस कधीच कर्ज फेडीपासून दूर पळत नाही. तसेच, शेतीवर कितीही संकटे आली तरी तो आत्महत्या करीत नाही;  तो लढतो.  

आपण जो शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेसाठी आधी उक्षीच्या ग्रामदेवतेसमोर कौल लावण्यात आला होता. देवीने कौल दिल्यानंतरच आपण येथे पालखी आणली. पुढील वर्षी पुन्हा देवीला कौल लावू आणि आज जेवढ्या उत्साहात हा महोत्सव साजरा केला. त्याच्या दुप्पट उत्साहात शिमगोत्सव साजरा करू. सलग चार दिवसांचा कोकण महोत्सव,  त्यामध्ये कोकणातील सर्वच तालुक्यांतील महत्वाच्या गावांतील पालख्या या स्पर्धेत सामावून घेऊ. ही स्पर्धा आजच्या पेक्षा अधिक भव्य दिव्य करून दहीहंडीप्रमाणेच पालखी नाचवण्याची ही संस्कृतीदेखील जगभर पोहचवू, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

संगमेश्वरच्या गांगोबा करंबेळे संघाने पटकावला प्रथम क्रमांक 

या ठिकाणी झालेल्या पालखी नृत्य स्पर्धेत सुमारे अकरा संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत २ लाख १० हजार रूपयांचे पहिले पारितोषिक संगमेश्वरच्या गांगोबा करंबेळे संघाने पटकावले. दुसरे 1 लाख 51 हजारांचे पारितोषिक राजापूरच्या रामेश्वर चिचवाडी संघाने, तिसरे 1 लाख 1 हजाराचे पारितोषिक वाघजाई मानोबा पालखी नृत्य पथक माखजन, संगमेश्वर यांनी पटकाविले.तर   श्री. नागेश्वर, रत्नागिरी (सोमेश्वर), तालुका रत्नागिरी, श्री. वाघजाई, उक्षि, ता. रत्नागिरी, सुखाई देवी, चिंचघरी, चिपळूण. तालुका चिपळूण,  जय त्रिमुख, मठ, तालुका लांजा., श्री वाघजाई देवी पालखी नृत्य पथक, तणाली, ता. चिपळूण,  जय सांबा,पाटगाव,देवरूख,तालुका संगमेश्वर, काळकाई पा. नृ. प. कुशिवडे, तालुका चिपळूण
, माखजन, ता. संगमेश्वर आणि  पद्मावती , मार्गताम्हाणे, तालुका गुहागर यांना उत्तेजनार्थ 25 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: palkhi dance from konkan will take it to international level announcement by jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.