उल्हासनगरात पाडकाम कारवाई थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:13 AM2017-11-07T00:13:25+5:302017-11-07T00:13:25+5:30
शहरासह रस्ता रुंदीकरणातील बांधकामावरील पाडकाम कारवाईबाबत महापौरांची भूमिका यशस्वी झाली असून या बांधकामावरील कारवाई थांबली आहे.
उल्हासनगर : शहरासह रस्ता रुंदीकरणातील बांधकामावरील पाडकाम कारवाईबाबत महापौरांची भूमिका यशस्वी झाली असून या बांधकामावरील कारवाई थांबली आहे. मात्र, दुसरीकडे आयुक्त अजूनही आक्रमक आहेत.
रुंदीकरणातील बांधकामाबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन पाडकाम कारवाईचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. तसेच वर्षभरात झालेल्या अवैध बांधकामाची यादी येत्या आठवड्यात अतिक्रमण विभागाला सादर करण्याचे आदेश प्रभाग अधिकाºयांना दिले आहेत.
उल्हासनगर महापालिकेने गेल्या महिन्यात रस्ता रुंदीकरणातील काही बांधकामांवर अचानक पाडकाम कारवाई सुरू केली. यामुळे दुकानदारांत खळबळ उडाली. नेहमीप्रमाणे दुकानदारांनी स्थानिक नेत्यांसह जिल्हास्तरीय नेत्याकडे धाव घेतली. तर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह महापौर मीना आयलानी, सभागृह नेते प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी आदींनी आयुक्त दुटप्पी भूमिका घेत कारवाई करत असल्याचा आरोप केला. रुंदीकरणातील बाधित दुकानांपैकी ८० ते ९० टक्के दुकानदारांनी दुकानांची दुरुस्ती करून बहुमजली बांधकामे केली, तेव्हा पालिकेने ही कारवाई का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सहा महिन्यांत उभ्या राहिलेल्या बांधकामावर आताच कारवाई का, असा प्रश्नही आयुक्त निंबाळकर यांना केला.
महापौर मीना आयलानी यांनी आक्रमक भूमिका घेत रुंदीकरणातील बांधकामावर पाडकाम कारवाई करण्यास आक्षेप घेतला. तसेच महासभेत आयुक्त निंबाळकर यांना आदेश दिला होता.
भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी सर्व पक्ष पदाधिकाºयांची बैठक महापौर मीना आयलानी यांच्या कार्यालयात गेल्या आठवड्यात बोलवली होती. यातच आयुक्तांना अप्रत्यक्षपणे घेराव आणि चलेजावचे संकेत दिले. बैठकीत भाजपा शिष्टमंडळाने आयुक्तांना रुंदीकरणातील बांधकामासह १८ मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले. त्यानंतरच, खºया अर्थाने रस्ता रुंदीकरणातील बांधकामावरील कारवाई थंडावली आहे. व्यापाºयांची बाजू मांडण्यात भाजपाचे प्रदेश सचिव प्रकाश माखिजा, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या भूमिकेमुळे शहरातील बांधकामावरील कारवाईला ब्रेक लागल्याची चर्चा शहरात आहे. दुकानदारांना मिळालेले हे अभय आता किती काळ टिकते, याकडेच साºयांचे लक्ष लागले आहे.