पॉलिटेक्निक महाविद्यालयाला ठोठावला दंड
By admin | Published: October 12, 2016 04:05 AM2016-10-12T04:05:27+5:302016-10-12T04:05:27+5:30
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याबाबत भरलेल्या रकमेची पावती आणि प्रवेश रद्द केल्यावर ती रक्कम परत न करणाऱ्या मातोश्री मणीबेन जेठालाल शाह पॉलिटेक्निक महाविद्यालयाला
ठाणे : कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याबाबत भरलेल्या रकमेची पावती आणि प्रवेश रद्द केल्यावर ती रक्कम परत न करणाऱ्या मातोश्री मणीबेन जेठालाल शाह पॉलिटेक्निक महाविद्यालयाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २० हजारांचा दंड सुनावला आहे. तसेच प्रवेशाची रक्कम ५० हजार परत करण्याचे आदेशही दिले आहेत.
भार्इंदर येथील मेहुल शहा यांनी मातोश्री मणीबेन जेठालाल शाह पॉलिटेक्निक महाविद्यालयात सन २००९-१० मध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेताना त्यांच्याकडे महाविद्यालयाच्या वतीने ५० हजार मागितले. त्यांनी ते दिले. मात्र, त्यांना १ हजाराची पावती दिली. याबाबत, त्यांनी विचारणा केली असता ती दुसऱ्या सत्रात दिली जाईल, असे सांगितले. त्यानंतर, शहा यांना आयकार्ड आणि बोनाफाइड सर्टिफिकेट देण्यात आले. मात्र, आॅगस्ट २००९ मध्ये दुसरीकडे प्रवेश घेण्याच्या कारणास्तव शहा यांनी प्रवेश रद्द करून रक्कम परत मागितली असता ती दिली नाही. मेहुल शहा यांनी याबाबत सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी भरलेले शिक्षणशुल्क परत द्यावे, असे निर्देश कॉलेजला दिले. मात्र, रक्कम मेहुल यांना दिली नाही. त्यामुळे त्यांनी मंचाकडे तक्रार दाखल केली. मेहुल शहा यांनी रक्कम दिलीही नव्हती आणि प्रवेशही घेतला नव्हता, असे कॉलेजने सांगून तक्रार खोटी असल्याचा दावा केला.
कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता १ हजाराची पावती आहे. कॉलेजच्या स्पष्टीकरणानुसार ५० हजार जर ट्युशन फीज म्हणून घेतले नसतील, तर प्रवेश दिल्यानंतर दिले जाणारे आयकार्ड आणि बोनाफाइड कोणत्या आधारे दिले, याचा खुलासा केला नाही.