माझ्या जमान्यातील पंचगिरी आव्हानात्मक होती : पंच पिलू रिपोर्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 04:40 PM2018-09-25T16:40:36+5:302018-09-25T16:42:45+5:30
ठाण्याचा धी युनाइटेड स्पोर्ट्स क्लबतर्फे पिलू रिपोर्टर यांचा ८० वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
ठाणे : मुंबईच्याआझाद मैदानावर स्थानिक सामन्यातून साडेपाच रुपये मानधनावर १९६८ साली एम.सी.ए.पॅनल पंच म्हणून मी पंचगिरीस प्रारंभ केला. स्थानिक,राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय स्तरावर पंचगिरी करण्याची संधी मला मिळाली. थ्रो (चक), नो बॉल व पायचीत हे तीनही निर्णय निमिषार्धात घ्यावे लागणाऱ्या कालच्या जमान्यातील मी पंच आहे.ताशी सुमारे दीडशेहून अधिक वेगाने होणाऱ्या गोलंदाजीवर पायचितचा निर्णय देणे म्हणजे कसोटी सामन्यातील कसोटी पंचाची कसोटीच असायची. तिसरा पंच, डी.आर.एस. व सोबतीला प्रगत तांत्रिक सोयी- सुविधा यांच्यामुळे आजच्या जमान्यातील पंचगिरी काहीशी सुकर झाली आहे. मात्र माझ्या जमान्यातील पंचगिरी आव्हानात्मक होती असे मनोगत जेष्ठ आंतर राष्ट्रीय क्रिकेट पंच ठाणे भूषण पिलू रिपोर्टर यांनी व्यक्त केले.
ठाण्याचा धी युनाइटेड स्पोर्ट्स क्लबतर्फे पिलू रिपोर्टर यांच्या ८० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून वाढदिवसाचे आयोजन करण्यांत आले होते. त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. क्लबचे अध्यक्ष भूपेंद्र ठाणेकर यांनी पिलू रिपोर्टर यांचा शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ, सन्मान चिंन्ह व मानपत्र देऊन गौरव केला. पाच सुहासिनींनी होमाय पिलू रिपोर्टर यांचा सौभाग्य अलंकारांनी गौरव केला. सीमा तांडेल यांनी मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी स्पोर्टींग क्लब कमिटीचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजेश मढवी, एम.सी.ए.पँनल पंच परीक्षेत पदार्पणालाच उत्तीर्ण होणारे पंच रिपोर्टर यांचे पहिले शिष्य विधितंज्ञ सदानंद भिसे विशेष आथिती म्हणून उपस्थित होते. कार्याध्यक्ष उमेश वसंत ठाणेकर, खजिनदार संकल्प कोळी, महिला मंडळ प्रमुख रजनी मधुकर ठाणेकर व्यासपीठावर उपस्थित होते. क्लबची राष्ट्रीय खो-खोपटू रोहिणी डोंबे-कोळी यांनी प्रास्ताविक केले तर उमेश ठाणेकर यांनी आभार मानले. प्रल्हाद नाखवा यांनी सूत्रसंचालन केले. विशेष अथिति म्हणून बोलताना डॉक्टर राजेश मढवी म्हणाले कि ठाण्याचा नावलौकिक जगभर करण्यास कारणीभूत ठरलेल्या पिलू रिपोर्टर यांच्या सारख्या महनीय व्यक्तीचे योगदान कला दालनाच्या माध्यमातूनजतन करायला हवे. तसेच त्यांनी लिहिलेल्या अँन हंम्पायर रिमेम्बर्स या इंग्रजी पुस्तकाचा मराठीतून अनुवाद व्हायला हवा. त्यासाठी मी पुढाकार घेण्यास तयार आहे. ठाण्याचे जेष्ठ डावखुरे आघाडीवर दिलीप रणदिवे यांनी आपल्या शुभसंदेशांत म्हटले आहे कि 80 वा वाढदिवस म्हणजे सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा. या योग आज भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशीच जुळून आला आहे.राजेश देशपांडे, चंद्रकांत म्हसे व मुकुंद टाकसाळे या रिपोर्टर सरांच्या शिष्यगणांनी सांगितले कि सरांची हसत खेळात शिकवणी हेच आमच्या यशाचे गुपित आहे. रिपोर्टरप्रेमी ठाणेकर क्रीडा रसिकांचा उत्तम प्रतिसाद या घरगुती वाढ दिवस समारंभास लाभला.