कलानी का हाथ भाजप के साथ, पंचम यांना उमेदवारीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:32 AM2019-09-29T00:32:33+5:302019-09-29T00:33:26+5:30

माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी किंवा पत्नी ज्योती कलानी यांना थेट उमेदवारी दिली तर आपल्यावर टीका होईल, याची जाणीव झाल्याने भाजपने कलानी यांच्या स्नुषा पंचम यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत

Pancham Kalani will candidature in Ulhasnagar | कलानी का हाथ भाजप के साथ, पंचम यांना उमेदवारीचे संकेत

कलानी का हाथ भाजप के साथ, पंचम यांना उमेदवारीचे संकेत

googlenewsNext

- सदानंद नाईक
उल्हासनगर : माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी किंवा पत्नी ज्योती कलानी यांना थेट उमेदवारी दिली तर आपल्यावर टीका होईल, याची जाणीव झाल्याने भाजपने कलानी यांच्या स्नुषा पंचम यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. ज्योती या भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्या तरी सुनेचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे उल्हासनगरात ‘कलानी का हाथ भाजप के साथ’मुळे राष्ट्रवादी काँग्रेस क्षीण होऊन तेथे भाजप प्रबळ होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीच्या शहरजिल्हाध्यक्ष व आमदार ज्योती कलानी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबात उमेदवारी दिली जाणार की, भाजपच्या आयलानी यांचा विचार केला जाणार यावरुन गेले काही दिवस तर्कवितर्क केले जात होते. अखेरीस ज्योती यांच्या राजीनाम्यामुळे कलानी यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. उल्हासनगरातील राष्ट्रवादी काँग्रेस ‘कलानीमुक्त’ झाल्याबद्दल महापालिकेतील गटनेते भरत गंगोत्री यांनी आनंद व्यक्त केला.

शिवसेना-भाजपची १९९५ मध्ये राज्यात सत्ता येण्यामागे बाबरी मशिदीचे पतन हे जसे कारण होते तसेच तत्कालीन भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ‘राजकारणाच्या गुन्हेगारीकरणा’विरोधातील लढाई हेही कारण होते. मुंडे यांनी कलानींवरुन शरद पवार यांना लक्ष्य केले होते. मात्र तरीही पवार यांनी कलानी यांना अंतर दिले नाही. मात्र उल्हासनगरात राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी भाजपने अगोदर कलानीपुत्र ओमी व त्यांची पत्नी पंचम यांना पक्षात प्रवेश दिला. आता ज्योती यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने भाजपला उल्हासनगर काबीज करणे सोपे होणार आहे.

उल्हासनगरात राष्ट्रवादी मजबूत होण्यासाठी शरद पवार यांनी २००२ मध्ये तत्कालीन शहरजिल्हाध्यक्ष आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेऊन ज्योती यांची निवड केली. उल्हासनगरात कलानी यांच्यामुळे राष्ट्रवादीने महापालिकेत सत्ता गाजवली. आता कलानी हेच उल्हासनगरात राज्य करतील व भाजप सत्ता गाजवल्याचा दावा करील.

पप्पू कलानी यांना भटीजा हत्याकांडात जन्मठेप झाली आहे. म्हणजेच मुंडे यांनी केलेले आरोप कायद्याच्या कसोटीवर खरे ठरले आहेत. मात्र हे वास्तव नजरेआड करून भाजपने महापालिका निवडणुकीत ओमी यांच्याशी सूत जुळवले व सत्ता संपादन केली. मात्र ज्योती या राष्ट्रवादीत तर ओमी व पंचम हे भाजपमध्ये असे दोन्ही परस्परविरोधी पक्ष एकाच घरात नांदत असल्याचे चित्र आतापर्यंत कलानी कुटुंबात दिसत होते. महापालिका निवडणुकीत ज्योती यांनी आपली शक्ती राष्ट्रवादीसाठी नव्हे तर भाजपसाठी खर्र्ची घातल्याचा आरोप झाला.

टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न

ज्योती किंवा ओमी यांना थेट भाजपची उमेदवारी बहाल न करता पंचम यांना करून स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्यावरील टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योती कलानी यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवल्यावर राष्ट्रवादीने शुकवारीच पक्ष निरीक्षक सुधाकर बढे यांना उल्हासनगरात पाठवून नवीन शहर कार्यकारिणी घोषित केली. त्यामुळे कलानी कुटुंबाशी राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष करीत असल्याचे वेगळे चित्र यंदाच्या निवडणुकीत दिसेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Pancham Kalani will candidature in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.