लोकमत इम्पॅक्ट - पूरातील पाच हजार घरांचे केले पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:05 AM2019-08-02T00:05:45+5:302019-08-02T00:05:56+5:30

पुराचा बसला फटका : उल्हासनगरमध्ये नागरिकांच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान

Panchanam made of five thousand houses | लोकमत इम्पॅक्ट - पूरातील पाच हजार घरांचे केले पंचनामे

लोकमत इम्पॅक्ट - पूरातील पाच हजार घरांचे केले पंचनामे

Next

उल्हासनगर : उल्हास व वालधुनी नद्यांच्या पुराचा फटका बसलेल्या तब्बल पाच हजार घरांचा पंचनामा केल्याची माहिती प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांनी दिली. उल्हासनगरसह बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण परिसराला उल्हास व वालधुनी नद्यांचा फटका बसून हजारो घरे पुराच्या पाण्यात गेली. पुराचे पाणी घरात शिरल्याने हजारो कुटुंबांनी जीव वाचवण्यासाठी घरांबाहेर पडून सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. मात्र, पुराच्या पाण्याने फ्रीज, टीव्ही, फॅन, वॉशिंग मशीनसह घरांतील अन्नधान्य, लाकडी सामान, अंथरूण, कपडे आदी भिजून खराब झाले. वस्तू खराब झाल्याने कचराकुंडीत टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली. पुराची झळ बसलेली घरे, कारखाने, दुकाने आदींचे पंचनामे गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाने केले आहे.

महापुरात सर्वकाही गमावून बसलेल्या हजारो नागरिकांचे डोळे आता सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. तहसील कार्यालयातील पथक गेल्या आठवड्यापासून पूरग्रस्तांची पाहणी करत असून पाच हजारांपेक्षा जास्त पंचनामे झाले आहे. ज्या पूरग्रस्त घरांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांनी प्रांत कार्यालयासह तहसील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. उल्हासनगरमध्ये १८०० पूरग्रस्त घरांचे पंचनामे केले असून अंबरनाथ व बदलापुरमधील संख्या चार हजारांपेक्षा जास्त आहे. वालधुनी नदीच्या पुराचा सर्वाधिक फटका समतानगर, वडोलगाव, रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, अयोध्यानगर, शांतीनगर, पवई चौक, शांतीनगर, कैलास कॉलनी आदी परिसराला बसला.

शिव मंदिर पुलाची तात्पुरती दुरुस्ती

नव्याचा प्रस्ताव : नगराध्यक्षांकडून पाहणी
अंबरनाथ : २६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात प्राचीन शिव मंदिराकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचे संरक्षक कठडे पडल्याने हा पूल धोकादायक झाला आहे. या पुलासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि शिवसेना शहरप्रमुखांनी या पुलाची गुरुवारी पाहणी केली. तसेच नव्या पुलाचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. मात्र, तोपर्यंत जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतील शिव मंदिराकडे जाणारा वालधुनी नदीवरील पादचारी पूल हा धोकादायक झाला आहे. त्यातच २६ आणि २७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात हा पूल पूर्ण पाण्याखाली होता. तसेच नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने या पुलावरील संरक्षक कठडे वाहून गेले आहे. तसेच पुलाचा पायाही खचला आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी या पुलाची पाहणी केली.जुन्या पुलाच्या ठिकाणी नव्या उंच पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. तो प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर त्या पुलाचे काम केले जाणार आहे.

अतिक्रमणे हटवण्याची मागणी

शहराला सर्वाधिक पुराचा फटका वालधुनी नदीच्या पुराचा बसला आहे. नदीकिनारी इमारती व बेकायदा बांधकामे झाल्याने, नदीचे पात्र अरुंद झाले आहे. तसेच नदीच्या पात्रातून उल्हासनगर व अंबरनाथ पालिकांनी भुयारी गटारांची वाहिनी टाकल्याने, पुराच्या पाण्याला अडथळा झाल्याचे बोलले जात आहे.

जुना पूल हा पादचाऱ्यांसाठी सुरक्षित असला तरी त्या पुलावरून लहान वाहने जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, नव्या पुलाबाबतचा प्रस्ताव तयार करत असताना हा पूल पाण्याच्या प्रवाहात येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश नगराध्यक्ष वाळेकर यांनी दिले आहेत. तसेच मंदिर परिसरात पाणी जाणार नाही, यासंदर्भातही उपाययोजना आखण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
 

Web Title: Panchanam made of five thousand houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.