पंचनामे झाले, पण मदतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:11 AM2019-09-16T00:11:20+5:302019-09-16T00:11:25+5:30

अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Panchanama, but no help | पंचनामे झाले, पण मदतच नाही

पंचनामे झाले, पण मदतच नाही

Next

डोंबिवली : अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले, पण अद्याप काही पूरग्रस्तांपर्यंत सरकारची मदत पोहोचलेली नाही. मदतीसाठी त्यांचे तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू असून, राजकीय मंडळींनीही आता याकडे दुर्लक्ष केल्याने मदत मिळणार तरी कधी, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील निवासी भागात ३ आणि ४ आॅगस्टला पूरजन्य परिस्थिती ओढावली होती. रहिवाशांच्या घरांत पाणी शिरून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी घरात शिरले होते. दरम्यान, आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस निवासी भागातील मिलापनगर परिसरातील रहिवाशांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन अन्य नागरी समस्यांसह पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला होता. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने ही समस्या ओढावल्याचे सांगताना व्यवस्थापनाचे चुकीचे नियोजन याला कारणीभूत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला होता. परंतु, अद्यापही काही रहिवाशांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. सरकारच्या आदेशानुसार तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते.
काही दिवसांतच मदत मिळेल, असेही त्यावेळी सांगितले होते. पंचनामा प्रक्रिया पूर्ण होऊन महिना उलटला, पण अद्याप मदत काही मिळालेली नाही. विशेष बाब म्हणजे, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेऊन येणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही याकडे लक्ष देत नसून ते आता फोनही उचलत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
तहसील कार्यालयाकडे मदतीसंदर्भात विचारपूस केली असता त्यांच्याकडून ठोस उत्तरे दिली जात नसल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी जी काय मदत असेल ती मिळावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. यासंदर्भात लोकमतने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याशी
संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.
>मदत मिळणार कधी?
घरामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे घरातील लाकडी सामानांसह कपड्यांचे तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. आमच्या घरासह तळ मजल्यावर असलेल्या तीन घरांमध्येही पाणी शिरून नुकसान झाले. तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे झाले, पण आतापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. कार्यालयाकडूनही स्पष्टपणे काही सांगितले जात नाही, अशी प्रतिक्रिया निवासी भागातील संदेश को-आॅप. हा. सोसायटीत राहणारे विश्वास सावंत यांनी दिली.

Web Title: Panchanama, but no help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.