पंचायत समिती सभापतीपद :भिवंडी, कल्याण ठरणार निर्णायक; मुरबाड भाजपाकडे, शहापूर-अंबरनाथ शिवसेनेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:19 AM2018-01-08T02:19:22+5:302018-01-08T02:21:22+5:30
भिवंडीत शिवसेना, भाजपाचे समसमान असलेले बळ आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला आलेले अनन्यसाधारण महत्त्व यामुळे भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदाची सोमवारी होणारी निवडणूक निर्णायक ठरणार आहे.
ठाणे : भिवंडीत शिवसेना, भाजपाचे समसमान असलेले बळ आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला आलेले अनन्यसाधारण महत्त्व यामुळे भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदाची सोमवारी होणारी निवडणूक निर्णायक ठरणार आहे. कल्याणमध्येही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून शिवसेनेसोबत जाणाºया राष्ट्रवादीला पदांची आॅफर देत भाजपाने राजकीय उलथापालथीची तयारी केली आहे.
सध्याच्या संख्याबळानुसार भिवंडी आणि कल्याणमध्येच शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसला सांभाळण्याची कसरत करावी लागेल. पण अंबरनाथ, शहापूरमध्ये शिवसेनेची सत्ता येईल. एकमेव मुरबाड पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता येईल. या निवडणुकीवर जिल्हा परिषदेचे चित्र अवलंबून आहे.
कल्याणला राष्ट्रवादीही रिंगणात-
कल्याण : कल्याण पंचायत समितीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने राष्ट्रवादीला पदांची आॅफर दिली आहे. राष्ट्रवादीने सभापतीपदावरील
दावा सोडलेला नाही.
शिवसेनेकडून रमेश बांगर, तर राष्ट्रवादीतर्फे भाऊ गोंधळी इच्छुक आहेत. शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीला मागेल ते
पद देण्याची तयारी भाजपाने दाखवल्याने ही निवडणूक चुरशीची होईल.
पंचायतीच्या १२ जागांपैकी भाजपाकडे पाच, शिवसेनेकडे चार आणि राष्ट्रवादीकडे तीन जागा आहेत.
भिवंडीत काँग्रेस,
मनसेवर लक्ष
भिवंडी : भिवंडीच्या ४२ जागांपैकी शिवसेना, भाजपाकडे प्रत्येकी १९ जागा आहेत. राष्ट्रवादीकडे एक जागा असली, तरी त्या पक्षाने जिल्हा परिषदेतील पदांच्या गणितासाठी शिवेसनेला पाठिंबा देण्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ २० झाले आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बदल्यात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला किंवा तो पक्ष तटस्थ राहिला तरी शिवसेनेला सभापतीपद मिळू शकते. त्या पक्षाकडे दोन सदस्य आहेत. मनसेच्या एकमेव सदस्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव सांगत आपला निर्णय जाहीर केलेला नाही. पण निवडणूक लढवताना तो पक्ष महायुतीत सहभागी असल्याने त्याचा पाठिंबा शिवेसनेला मिळेल, असे मानले जाते.
भाजपाने काँग्रेसच्या तालुका पदाधिकाºयांच्या मध्यस्थीने त्यांचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु माजी खासदार सुरेश टावरे यांनी त्याचा इन्कार केला.
भाजपाला मतदान करू नये, असा व्हिप पक्षाने काढला. सभापतीपदासाठी शिवसेनेत वेहळे गावातील विद्या थळे यांचे नाव पुढे आहे. थेट पाठिंबा दिल्यास उपसभापतीपद काँग्रेसला दिले जाईल. अन्यथा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. भाजपाने सभापती आणि उपसभापतीपदासाठी रवीना रवींद्र जाधव,नमिता नीलेश गुरव व ललिता प्रताप पाटील यांच्या नावाची तयारी केली आहे.
अंबरनाथला
स्वप्नाली भोईर-
अंबरनाथ : अंबरनाथ पंचायतीच्या आठपैकी सात जागा शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीने मिळवल्याने सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या स्वप्नाली भोईर यांचीच बिनविरोध निवड होईल.विरोधी पक्षाकडे उमेदवार नसल्याने, भाजपाचा एकच उमेदावर विजयी झाल्याने भोईर यांचा मार्ग सोपा झाला आहे. ओबीसी महिलांसाठी आरक्षण असल्याने शिवसेनेकडे दोन उमेदवार पुढे आले होते. त्यातील चोण गणातील विजयी उमेदवार स्वप्नाली भोईर यांचे नाव आघाडीवर आहे. पहिले सव्वा वर्ष भोईर यांना सभापतीपद दिले जाईल. त्यानंतर नेवाळी भागातील उमेदवारांपैकी एकाला हे पद दिले जाणार आहे.
मुरबाडमध्ये दोन दावेदार
मुरबाड : माळ गणातून निवडून आलेले दत्तू गणपत वाघ आणि म्हसा गणातून निवडून आलेले जनार्दन पादीर यांच्यात मुरबाडच्या सभापतीपदासाठी चुरस आहे. उपसभापती पदासाठी कुडवली गणातील चंद्रकांत सासे व वैशाखरे गणातील सीमा अनील घरत दावेदार असल्याची चर्चा आहे. १६ पैकी ११ जागा जिंकल्याने या पंचायतीवर भाजपाचे वर्चस्व आहे. आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नाने स्पष्ट बहुमत मिळाल्याने ते सांगतील, तोच सभापती व उपसभापती होणार आहे.
शहापुरात शिवसेनेतच रस्सीखेच
शहापूर : शहापूरचे सभापतीपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे आणि शिवसेनेच्या सहा महिला सदस्य त्यासाठी इच्छुक असल्याने तीव्र चुरस आहे. शहापूरच्या २८ पैकी १८ जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. येथे राष्ट्रवादीशी आघाडी न झाल्याने सर्व पदे शिवसेनेकडेच असतील. साकडबाव गणातील यशोदा आवटे या सभापती होतील, असा अंदाज आहे.