पंचायत निवडणूक : दोन्ही काँग्रेसने बिघडवले सेनेचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:43 AM2018-01-09T02:43:07+5:302018-01-09T02:43:20+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली आघाडी ही त्यावेळेपुरती होती, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याणमध्ये भाजपाला हाताशी धरत पंचायतीचे सभापतीपद पदरात पाडून घेतल्याने एकच गोंधळ उडाला.

Panchayat elections: Both Congress defeated army math | पंचायत निवडणूक : दोन्ही काँग्रेसने बिघडवले सेनेचे गणित

पंचायत निवडणूक : दोन्ही काँग्रेसने बिघडवले सेनेचे गणित

Next

ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली आघाडी ही त्यावेळेपुरती होती, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याणमध्ये भाजपाला हाताशी धरत पंचायतीचे सभापतीपद पदरात पाडून घेतल्याने एकच गोंधळ उडाला. भिवंडीत काँग्रेसने भाजपाला साथ दिल्याने मनसेला उपसभापतीपद देण्याची वेळशिवसेनेवर आली. जिल्हा परिषदेचे गणित बिघडू नये, यासाठी शहापूरमध्ये आघाडी नसतानाही शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला उपसभापतीपद देत नवे मैत्रीपर्व सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सोमवारी पंचायत समितीच्या निवडणुकीत घेतलेल्या या निर्णयामुळे पुढील सोमवारी होणाºया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सारी गणिते बदलली आहेत.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सभापतीपद मिळवण्याची शिवसेनेची तयारी आहे, तर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एका अपक्षाच्या बळावर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वाट्टेल ती खेळी करण्याची तयारी केल्याचेच पंचायत समितीच्या निवडणुकीतून दिसून आले.
शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे यांच्यासह अन्य छोट्या पक्षांना सोबत घेऊन युती-आघाडी करत, छुपा पाछिंबा घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला धोबीपछाड दिला होता. भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ, मुरबाड या पाच पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ही महायुती फुटल्याचे दिसून आले. अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची, तर मुरबाडमध्ये भाजपाची सत्ता अपेक्षेप्रमाणे आली. पण कल्याणमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेची साथ सोडत सभापतीपद पदरात पाडून घेतले. भिवंडीत काँग्रेसने भाजपाला साथ दिल्याने त्या गटाचे आणि शिवसेना-राष्ट्रवादीचे बलाबल समसमान झाले. त्यामुळे चिठ्ठी टाकल्यावर सभापतीपद भाजपाकडे गेले, तर मनसेला उपसभापतीपद दिल्याने शिवसेनेच्या हाती काहीच उरले नाही. या साºया खेळात शहापूरमधील काँटे की टक्कर विसरून शिवसेनेने तेथे राष्ट्रवादीशी मिळतेजुळते घेतले. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंबरनाथमध्ये भोईर बिनविरोध
अंबरनाथ : अंबरनाथ पंचायतीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या स्वप्नाली भोईर यांचा, तर उपसभापतीपदासाठी सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली. या पंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने आठपैकी सात जागा जिंकल्या होत्या. भाजपाचा एकमेव सदस्य असल्याने भोईर यांची बिनविरोध निवड होईल हे स्पष्ट होते. उपसभापतीपदासाठी तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी यांनीही अर्ज भरला होता. मात्र ठरल्याप्रमाणे माघार घेत त्यांनी उपसभापतीपद पाटील यांना सोडले. सभापतीपदासाठी मात्र भोईर यांचा एकमेव अर्ज होता. निवडणुकीची प्रक्रिया संपल्यावर शिवसेनेने जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, प्रभू पाटील, एकनाथ शेलार, नरेंद्र शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुरबाडमध्ये जनार्दन पादीर
मुरबाड : मुरबाड पंचायतीच्या सभापतीपदी जनार्दन पादीर आणि उपसभापतीपदी सीमा घरत यांची बिनविरोध निवड झाली. या पंचायतीतील १६ पैकी ११ जागा जिंकून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्यामुळे निवडणूक ही औपचारिकता होती.
सभापतीपदासाठी म्हसा गणातून निवडून आलेले जनार्दन पादीर यांचा एकमेव अर्ज होता. उपसभापतीपदासाठी सीमा अनिल घरत यांचाही एकमेव अर्ज दाखल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य अनुपस्थित राहिले.

शहापूरच्या सभापतीपदी मेंगाळ
शहापूर : शहापूर पंचायतीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या शोभा मेंगाळ आणि उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या वनिता भेरे यांची निवड झाली. येथे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत आघाडी नसतानाही राष्ट्रवादीला उपसभापतीपद मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंद, तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत असंतोष होता. जिल्हा परिषद सभापतीपदासाठी राष्ट्रवादीने मदत करावी म्हणून शिवसेनेने ही खेळी केली. शिवसेनेला पंचायतीच्या १८, राष्ट्रवादीला सहा जागा मिळाल्या आहेत. मेंगाळ आणि भेरे वगळता कोणाचेही अर्ज न आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा झाली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापती, उपसभापतींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेत शिवसेनेला राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकू नये यासाठी विरोधकांनी पुरेपूर प्रयत्न केले. पण धनशक्ती विरु द्ध जनशक्ती जिंकल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

भिवंडीत चिठ्ठीची किमया
भिवंडी : भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना उमेदवाराला समान मते मिळाल्याने शालेय विद्यार्थ्यांव्दारे उचललेल्या चिठ्ठीमुळे सभापतीपदी भाजपाच्या रवीना रवींद्र जाधव यांची निवड झाली. शिवसेनेने पाठिंबा दिलेल्या मनसे उमेदवार वृषाली रवींद्र विशे यांची उपसभापतीपदी निवड झाली. भाजपाला सभापतीपद मिळताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला
भिवंडी पंचायत समितीची लढत चुरशीची बनल्याने पालकमंत्री एकनाथ श्ािंदे सकाळपासून तळ ठोकून होते. पण शिवसेनेने प्रतिष्ठेच्या बनविलेल्या निवडणुकीचा निकाल भाजपाच्या पारड्यात गेला. या पंचायतीत भाजपा १९, शिवसेना १९, काँग्रेस दोन, मनसे एक, राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सभापतीपदासाठी भाजपातर्फेरवीना जाधव, शिवसेनेतर्फे विद्या थळे, ललिता प्रताप पाटील यांनी अर्ज भरले होते. त्यातील पाटील यांनी माघार घेतली. शिवसेना व भाजपाच्या उमेदवारांना समान २१-२१ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढली. त्यात जाधव निवडून आल्या.
उपसभापतीपदासाठी अर्ज भरलेल्यांपैकी संध्या पंडित-नाईक व रवीना जाधव यांनी अर्ज मागे गेतले. त्यामुळे मनसेच्या वृशाली विशे व ललिता पाटील यांचा लढत झाली. त्यांनाही समान २१-२१ मते मिळाली. तेव्हा काढलेल्या चिठ्ठीत मनसेला कौल मिळाला.

Web Title: Panchayat elections: Both Congress defeated army math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे