परवाना नसताना उभारले रस्ते अडवून मंडप; वाहतुकीला अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 08:35 PM2019-08-28T20:35:44+5:302019-08-28T20:39:46+5:30
या मंडपांना परवानगी नसताना पालिका आणि पोलीसांनी मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.
मीरारोड - नागरीकांना रहदारी व वाहतुकीला अडथळा ठरु नये तसेच आपत्कालिन वेळी रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सहज जावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्याच्या एक तृतियांश भागातच मंडप उभारणीस परवानगीचे आदेश दिले असताना मीरा भाईंदरमध्ये महापालिका, पोलीस यांच्या संगनमताने सर्रास रस्ते बंद करुन मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडपांना परवानगी नसताना पालिका आणि पोलीसांनी मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.
मीरा भाईंदरमध्ये पोलीस आणि महापालिका गणेशोत्सवाच्या निमीत्ताने सार्वजनिक मंडळं, लोकप्रतिनिधी आदिंच्या बैठक घेत आहे. पण सदरच्या बैठका निव्वळ बैठका घेतल्याचे दाखवण्यासाठीचा फार्स ठेला आहे. वास्तविक रस्त्याच्या एक तृतियांश भागातच मंडपसाठी परवानगी देण्याचे उच्च न्यायालय व शासनाचे आदेश आहेत. तसेच कमानी उभारण्यास देखील मनाई आहे. तरी देखील सार्वजनिक रस्ते, पदपथ वर सर्रास मंडप, कमानी उभारल्या जातात . रस्त्यांवर खड्डे खोदुन बांबु उभारुन त्यावर रोषणाई , जाहिरात फलक लावले जातात.
भार्इंदर पूर्वेचा जेसल पार्क, नवघर मार्ग, खारी गाव - व्यंकटेश नगर , भार्इंदर पश्चिमेचा विनायक नगर , मोदी पटेल , नारायण नगर, मीरारोड आदी शहरातील अनेक भागात रस्ते पूर्णपणे वा मंजुर रुंदी पेक्षा जास्त प्रमाणात बंद करून भले मोठे मंडप उभारण्यात आले आहेत .
रस्ता बंद करुन उभारलेल्या मंडपां मुळे लोकांना पायी वाट काढणे अशक्य झाले आहे . तर अनेक ठिकाणी रस्त्यात प्रमाणा पेक्षा जास्त मंडप उभारण्यात आले आहेत. रस्ता पुर्णच बंद करुन मंडळांनी वाहतुक पुर्णपणे बंद केली गेली आहे. तर काही प्रमाणातच रस्ता खुला ठेवल्याने देखील वाहतुकीची कोंडी होत आहे. काही ठिकाणी तर रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन तर सोडाच चारचाकी कार देखील जाणार नाही अशी स्थिती आहे.
महापालिका आणि पोलीसांची परवानगी नसतानाच असे रस्ता बंद करुन वा जास्त रस्ता व्यापुन मंडप उभारण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणी महापालिका प्रभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांनी मात्र या गंभीर बाबी कडे डोळेझाक चालवली आहे. आधी रस्ता अडवुन बेकायदा मंडप उभारणीस महापालिका व पोलीसांनी संरक्षण द्यायचे आणि मग मंडप आदी उभारुन झाले की मग मात्र कायदा सुव्यवस्थेचा मुदद्दा पुढे करुन कारवाई टाळायची असा फंडा यंत्रणेने अवलंबला आहे.
अशा बेकायदा मंडप व कमानी उभणारणारयां विरोधात महापालिका गुन्हे देखील दाखल करत नाही. पोलीस सुध्दा कार्यवाही करत नाहीत. यामुळे आधीच शहरात वाहतुक कोंडी होऊन रहदारीला अडथळा होत असताना मंडप व कमानींमुळे त्यात मोठी भर पडून नागरीकांना मन:स्ताप सहन करावा लागतोय. इतकेच नव्हे तर नागरीकांची सुरक्षितता देखील पालिका, पोलीसांनी वारायावर सोडली आहे.
मंडळांना आधीपासुन आदेशांचे काटेकोर पालन करा म्हणुन सांगितलेले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन केले जात नसेल आणि रस्ते बंद वा अडवुन मंडप उभारले गेले असतील तर याचा आढावा प्रभाग अधिकाऱ्यांकडून घेऊ. कोणत्याही स्थितीत बेकायदा मंडप खपवुन घेणार नाही, अशांवर कारवाई करु. - बालाजी खतगावकर ( आयुक्त, महापालिका )