मंदिर बंद तरीही घडले पांडुरंगाचे ‘मनस्वी’ दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:28+5:302021-07-21T04:26:28+5:30
ठाणे : कोरोनामुळे सर्वत्र मंदिर बंद असले तरी ठाणे शहरात दोन दिवस अगोदरच साक्षात पांडुरंगाने दर्शन दिले असल्याचे पाहायला ...
ठाणे : कोरोनामुळे सर्वत्र मंदिर बंद असले तरी ठाणे शहरात दोन दिवस अगोदरच साक्षात पांडुरंगाने दर्शन दिले असल्याचे पाहायला मिळत होते. टेंभीनाका येथे राहणाऱ्या मनस्वी दाभोळकर हिने पांडुरंगाची वेशभूषा करून भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घडविले.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पांडुरंग, पांडुरंग असा जयघोष करून वारकरी वारीला जात असतात; परंतु दोन वर्षे त्यांची वारी कोरोनामुळे चुकली. वारी चुकल्याचे दुःख त्यांच्या मनात असले तरी विठुरायाचा नामजप यानिमित्ताने त्यांच्या मुखी ऐकायला मिळत आहे. कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने मंगळवारी घराघरात विठुरायाची पूजा करून कोरोनाचे संकट दूर करण्याची प्रार्थना करण्यात आली. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी आपल्या विठुरायाला भेटण्याची इच्छा मनस्वी हिने पूर्ण केली. तिची आई मीनल दाभोळकर आणि संदीप हातीपकर यांच्या संकल्पनेतून तिला विठुरायाच्या वेशभूषेत सादर करण्यात आले. पाऊस असल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी ही संकल्पना राबविली. मीनल यांनी मनस्वीचा मेकअप केला होता. यावेळी मनस्वी श्री कौपीनेश्वर मंदिर, गडकरी रंगायतन, तलावपाळी, गावदेवी येथील विठू रखुमाई मंदिर याठिकाणी विठुरायाच्या वेशभूषेत उभी राहिली होती. तिला बघण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. ती सेंट जॉन या शाळेत इयत्ता नववीत आहे.
-----------