उल्हासनगरच्या सिंधी परिसरांत दहशत

By admin | Published: February 22, 2017 06:13 AM2017-02-22T06:13:41+5:302017-02-22T06:13:41+5:30

एकीकडे मतदानासाठी खूप कमी प्रमाणात उतरणाऱ्या सिंधी समाजाने राजकीय संघर्षात दहशत

Panic in the Sindhi region of Ulhasnagar | उल्हासनगरच्या सिंधी परिसरांत दहशत

उल्हासनगरच्या सिंधी परिसरांत दहशत

Next

उल्हासनगर : एकीकडे मतदानासाठी खूप कमी प्रमाणात उतरणाऱ्या सिंधी समाजाने राजकीय संघर्षात दहशत अनुभवल्याने सिधीभाषक परिसरातील मतदानालाही त्याचा फटका बसला. सिंधी बहुल असलेले प्रभाग ५,७, ९ व ११ मध्ये थेट साई पक्ष विरूध्द भाजप-ओमी टीम असा संघर्ष रंगला. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आपापसात भिडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या दंबगगिरीला घाबरून अनेक जणांनी मतदान न केल्याचा दावा केला.
उल्हासनगर पश्चिममध्ये सर्वाधिक सिंधीबहुल प्रभाग असून पूर्वेत फक्त १६ व १७ सिंधी असे दोन प्रभाग आहेत. प्रभाग ९ च्या साई पक्षाच्या उमेदवार माजी महापौर आशा इदनानी यांच्या गाडीवर सकाळी दगड फेकला, तर प्रभाग ७ मध्ये रिपाइं व ओमी-टीमचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रभाग ११ मध्ये भाजप-ओमी टीमचे कार्यकर्ते व साई पक्षाचे प्रवीण कृष्णानी यांच्यात हाणामारीचे प्रकार झाले. तसेच २, ५, ६, ८, १६ मध्ये तणावाचे वातावरण होते. तेथेही हाणामारीचे प्रकार घडले. या प्रकाराने सिंधीबहुल परिसरात दशहतीचे वातावरण निर्माण झाले. भाजप व ओमी टीमने इतर पक्षातून आलेल्या अनेक गुन्हेगार वृत्तीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याने निवडणुका दहशतीच्या सावटाखालीच पार पडल्या.
शहरातील नेताजी चौक, गाऊन मार्केट, तहसील कार्यालय, प्रभाग १६ चा परिसर, पश्चिमेतील संत कुँवाराम चौक, अनील-अशोक टॉकिजचा परिसर, खेमानी परिसर, सोनार गल्ली, गोलमैदान परिसर, जुना बसस्टॉप आदी सिंधीबहुल परिसरातून आजपर्यंत सिंधी भाषक नगरसेवक निवडून आले. परांपरागत राजकीय विरोधक भाजप व कलानी कुटुंब एकत्र आल्याने तेथील निवडणुका एकतर्फी होतील, असे वाटप होते. पण साई पक्षाने भाजप व ओमी टीमसमोर आव्हान निर्माण करून त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
परिणामी भाजपा व ओमी टीमने कल्याण पॅटर्न राबवित साई पक्षाच्या उमेदवारासह मतदारांना धमकावणे सुरू केले. या प्रकाराने सिंधी परिसरात दहशत निर्माण होवून नागरिकांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचा दावा केला जात आहे. (प्रतिनिधी)

भाजपा-शिवसेनेची जम्बो टीम
भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, पक्ष निरीक्षक दिगंबर विशे, माजी आमदार व शहर अध्यक्ष कुमार आयलानी, ओमी कलानी यांनी प्रत्येक प्रभागात उमेदवाराच्या व मतदान केंद्रप्रमुखांच्या भेटी घेतल्या. शिवसेनेतर्फे आमदार बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे समाजसेवी संधटनेसह, रस्त्यावर उतरले होते. तर साई पक्षाकडून एकमेव साई बलराम यांनी जबाबदारी पेलली.

मराठमोळ्या वस्त्यांतही दिसला तुरळक उत्साह

उल्हासनगर : उल्हासनगरच्या मराठमोळ््या वस्त्यांतही मतदान केंद्राबाहेर किरकोळ गर्दी होती. काही बूथवर तर चार ते पाच मतदारच रांगेत उभे होते. पण झोपडपट्टीचा समावेश असलेल्या मतदार केंद्रात मतदान सुरू होताना सकाळी आणि सायंकाळी मतदान समाप्तीवेळी बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. मराठी मतदारांचा सर्वाधिक समावेश असलेल्या कॅम्प ४ आणि ५ मध्ये केंद्राबाहेर गर्दी होती. अनेक मतदारांना घरातून घेऊन येण्यासाठी उमेदवारांनी खास रिक्षा आणि गाड्यांची व्यवस्था केली होती.
सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत बहुतांश केंद्रांकडे मतदारांनी पाठ फिरवली होती. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर १० ते १५ मतदारांचीच रांग दिसत होती. काही ठिकाणी तर अवघे ४ ते ५ मतदारच रांगेत उभे होते. मतदार सकाळी लवकर निघत नसल्याने १० नंतर सर्वच पक्ष आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना घरातून बाहेर काढण्यावर भर दिला. त्यांना आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था केली. त्यामुळे १० नंतर दोन तास मतदान केंद्रात गर्दी होती.
गायकवाडपाडा, दुर्गापाडा या परिसरात मतदारांनी मतदानासाठी १० नंतर गर्दी केली होती, तर कॅम्प ५ मधील कैलाशनगर भागात मतदारांनी केंद्राकडे पाठ फिरवली होती. या परिसरात मराठी मतदार जास्त असले तरी त्यांनीही दुपारनंतरच मतदान केंद्राकडे जाणे पसंत केले. मराठा सेक्शन, सुभाष टेकडी, व्हिनस टॉकीज परिसर आणि कुर्ला कॅम्प परिसरात केंद्राबाहेर रांगा होत्या. मात्र फार गर्दी नसल्याने अवघ्या १० ते १५ मिनिटांत मतदार हक्क बजावून बाहेर पडत होते. दुपारी उन्हामुळे गर्दी होणार नाही, असे गृहीत धरण्यात आले होते. मात्र कामकाज आटोपून अनेक मतदारांनी दुपारनंतरही मतदान केंद्रात हजेरी लावली. मात्र १० ते १२ या वेळेत झालेली मतदारांची गर्दी ही सर्वाधिक होती, तर दुपारच्या सत्रानंतर सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत देखील मतदारांनी आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात रांग लावली. झोपडपट्टी भागातील नागरी वस्तीत मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फौज तैनात असल्याने तेथे मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. त्यानंतरही मतदारांची नावे यादीत नसल्याने गोंधळ होता. यादीत नाव नसल्याने अनेक महिलांना मतदान न करताच परतावे लागले. मतदान केंद्रातही गोंधळाचे वातावरण होते. काही ठिकाणी चार उमेदवारांसाठी तीन, तर काही ठिकाणी अवघी दोनच यंत्रे असल्याने नक्की चार मते दोन मशिनवर द्यायची कशी, असा गोंधळ मतदारांमध्ये निर्माण झाला होता. अखेर मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी मशिनवरील प्रत्येक रंगावरील एका मतदाराला मत देण्याच्या सूचना दिल्यावर त्या मतदारांचा गोंधळ कमी होत होता. नावे मतदार यादीत नसल्याने उघडपणे नाराजी व्यक्त होत होती.
मतदारांना मतदान केंद्रात पोचविण्यासाठी कार्यकर्ते हजर होते, तर याच कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाचे अनेक बडे पदाधिकारी आणि शेजारील शहरातून आलेले पक्षाचे नेतेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Panic in the Sindhi region of Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.