पाणीपुरी, दूषित आइसगोळा वाढवतो लहान मुलांचा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 11:36 AM2023-05-22T11:36:58+5:302023-05-22T11:37:09+5:30
- अनिकेत घमंडी लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : उन्हाळा आला की शीतपेय विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, बर्फाचा गोळा घेताना ...
- अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : उन्हाळा आला की शीतपेय विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत कुणालाच शंका येत नाही. उन्हाची काहिली शमविण्यासाठी बर्फाचा गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान-मोठ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतु बर्फगोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येतो. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी झाली आहे. पाणीपुरी देखील कुठेही मिळते, पण त्यातील पाणी, ते पदार्थ देणारे यांची स्वच्छता तेवढीच महत्त्वाची असते, अनेकदा डॉक्टर असे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत, असा सल्ला देतात.
पाणीपुरीतून गॅस्ट्रोचा धोका
अस्वच्छ पाणी : पाणीपुरीमध्ये पाण्याचे महत्त्व जास्त असून अस्वच्छ, घाण पाणी असेल तर ते पोटात जाऊन इन्फेक्शन होऊन व्यक्ती आजारी पडू शकते. त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी, विशेषतः रस्त्यावरील गाड्यांवरील पाणीपुरी खाऊ नये, असे आवाहन महापालिका आरोग्य विभाग वारंवार करते.
हातांची अस्वच्छता : पाणीपुरी देणारी व्यक्ती तासन्तास हातगाड्यांवर उभी राहते. उन्हातान्हात असल्याने प्रचंड घाम येतो, त्या अवस्थेत ते लघवीला जातात, स्वच्छ पाण्याने हात धुतातच असे नाही, त्याच हाताने पाणीपुरी देतात, त्यामुळे आजार होऊ शकतो.
गोळ्यातला बर्फ कोणत्या पाण्याचा
रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा व आईस कॅन्डी तयार केली जाते. निम्न दर्जाचा रंग आणि सॅकरीनचा विक्रेते उपयोग करतात. बर्फगोळ्याच्या स्वरूपात आजार विकत आहोत, याची कल्पना विक्रेत्यांना असते. बर्फगोळे विक्रेत्यांच्या ठेल्यावर नेहमीच अस्वच्छता असते. त्यातच गोळा तयार करताना बर्फ लोखंडाच्या ब्लेडमधून किसला जातो. या ठेल्यावर बऱ्याचदा रासायनिक रंगाच्या बाटल्या उघड्यावर ठेवलेल्या असतात.
बर्फाचा मूळ वापर रुग्णालयांमध्ये औषधांचा अथवा सलाईनचा साठा करण्यासाठी होतो. मच्छीमार याचा वापर मासे ताजे राहण्यासाठी करतात. बर्फाचा सर्वाधिक वापर हा रासायनिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये होतो. विक्रेते वापरलेल्या बर्फाची विक्री करतात. ते शरीरासाठी हानीकारक असते. कारखान्यातही बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो जास्त काळ टिकावा, यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते.
डॉक्टरांचे आवाहन
अशुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ आजाराला आमंत्रण देणारा आहे. त्यामुळे पोटाचे विकार, कावीळ, डायरिया आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. या आजारांचे प्रमाण उन्हाळ्यात अशुद्ध बर्फाचे सेवन केल्यामुळे वाढते. लग्नात बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. घरी येऊन पाणी प्यावे. रस्त्यावर बर्फमिश्रित रस आणि अन्य पदार्थ खाऊ नये.